Belagavi

बेळगावात भगवान महावीर जन्म कल्याणक भक्तिभावाने

Share

भारतीय जैन मिलन संघटनेच्या वतीने बेळगावातील धर्मनाथ भवनात भगवान महावीर जन्म कल्याणक अर्थात जयंती आज भक्तिभावाने विविध धार्मिक विधींनींशी साजरी करण्यात आली.

समस्त विश्वाला त्याग आणि अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थन्कर भगवान महावीर यांची 2632वी जयंती बेळगावात आज उत्साह, भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. धर्मनाथ नगरातील धर्मनाथ भवनात भारतीय जैन मिलन संघटनेच्या वतीने त्याचे आयोजन केले होते. जन्मकल्याणक निमित्त पंचामृत अभिषेक व अन्य धार्मिक पूजाविधी करण्यात आले. त्यानंतर भगवान महावीरांच्या पाळणा उत्सव पार पडला. महिला भक्तांनी पाळणा गीते गाऊन बाल महावीरांच्या जन्मसोहळा साजरा केला.

यासंदर्भात आपली मराठीला माहिती देताना भारतीय जैन मिलनचे अध्यक्ष विजय उपाध्ये यांनी सांगितले की, जैन धर्माचे 24वे तीर्थन्कर भगवान महावीर यांची 2632वी जयंती आज आम्ही येथे भारतीय जैन मिलनच्या वतीने भक्तिभावाने साजरी करत आहोत. देशात शांती, सुख, समाधान नांदो अशी प्रार्थना यानिमित्त भगवान महावीरांच्या चरणी केली आहे. भगवान महावीरांनी जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला आहे. आजच्या काळात तो लागू पडतो. या संदेशाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जैन धर्म हा त्यागाचा धर्म आहे. सर्वांनी त्याग करून प्रेम आणि बंधुभावाने रहावे अशी शिकवण भगवान महावीरांनी दिली आहे. त्याचे पालन केल्यास जगात युद्ध, रोगराई, नैसर्गिक संकटे येणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. नागराज मरेन्नावर यांनी सांगितले की, भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धर्मनाथ भवनात पंचामृत अभिषेक, पाळणा, जन्मसोहळा आदी विधी पार पडले. या उत्सवात सुमारे एक हजार जैन श्रावक-श्राविका सहभागी झाले. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थन्कर, त्यांच्या काळात जैन धर्माला पुनर्वैभव प्राप्त झाले. अनेकांत सिद्धांत अर्थ एका गोष्टीकडे विविध दृष्टिकोनातून पाहणे, विचार करणे तसेच जग आणि जगू द्या असा संदेश त्यांनी दिलाय. त्यांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.

भगवान महावीर जनकल्याणक सोहळ्यात बेळगाव शहरासह धर्मनाथनगर, माळमारुती, श्रीनगर, शाहूनगर, वैभवनगर, ऑटो नगर, अंजनेय नगर आदी भागातील शेकडो जैनधर्मीय उपस्थित होते.

Tags: