Belagavi

चन्नम्मा चौक ‘प्रोटेस्ट फ्री झोन’ जाहीर करा : जायंट्स ग्रुपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Share

बेळगावातील नेहमी गजबजलेल्या चन्नम्मा चौकात रोजच्या निदर्शने, आंदोलनांमुळे नागरिकांना, रुग्णांना त्रास होत असल्याने हा चौक प्रोटेस्ट फ्री झोन जाहीर करण्याची मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने केली आहे. या संदर्भात आजी ग्रुपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बेळगावचा केंद्रबिंदू असलेला वीर राणी चन्नम्मा चौक सतत गजबजलेला असतो. शहराच्या अनेक भागांना जोडणारा हा एक प्रमुख चौक आहे. याशिवाय चौकाच्या आसपास जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, सब रजिस्ट्रार, एडीएलआर, प्रांताधिकारी, सैनिक बोर्ड, जिल्हा पंचायत आदी अनेक महत्वाची सरकारी कार्यालये, जेएमएफसी आणि जिल्हा व सत्र न्यायालये, तसेच बीम्स सरकारी जिल्हा इस्पितळ, सरदार्स हायस्कूलसह अनेक शिक्षणसंस्था आहेत. त्यामुळे येथे दररोज दिवसभर विध्यार्थी, कामगार, वकील, पक्षकार आदी नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे बेळगावातील हा एक प्रमुख चौक आहे. या चौकात दररोज एक ना दोन निदर्शने, आंदोलने, मोर्चे, मानवी साखळी आदी आंदोलने होत असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहतूक थांबवून नियंत्रण करावे लागते.

त्यामुळे गड्बडीच्या वेळेला नागरिकांची विनाकारण अडवणूक होते. विध्यार्थ्यांना शाळेला जायला वकिलांना उशीर होतो. गंभीर बाब म्हणजे, बीम्स, केएलई व अन्य रुग्णालये, इस्पितळात जाणाऱ्या रुग्णांच्या आंदोलनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत ऍम्ब्युलन्स अडकून राहिल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ येते. या सर्व बाबींचा विचार करून चन्नम्मा चौक हा आंदोलनमुक्त प्रदेश (प्रोटेस्ट फ्री झोन) जाहीर करण्याची मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने केली आहे. या संदर्भात आजी ग्रुपतर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना जायंट्सचे पदाधिकारी मदन बामणे यांनी सांगितले की, चन्नम्मा चौकात विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या आंदोलनांमुळे होणाऱ्या नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे शालेय विध्यार्थी, वकील, पक्षकार, सरकारी नोकर, कामगार, रुग्ण अशा सगळ्यांचीच गैरसोय होत आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन देऊन चन्नम्मा चौक प्रोटेस्ट फ्री झोन जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्किट हाऊसच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे 4 एकर जमीन आहे, तेथे प्रोटेस्ट झोन करण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष सुनिल मुतगेकर, फेडरेशन सदस्य मोहन कारेकर, शिवराज पाटील, अशोक हलगेकर, सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसुर, उपाध्यक्ष अरुण काळे, अजित कोकणे, राहुल बेलवलकर, एस.सुरेश, पद्मप्रसाद हुली आदी उपस्थित होते.

Tags: