निवृत्त पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांना सेवारत पोलिसांनी आणि समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी असे आवाहन उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार यांनी केले.
बेळगावात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या कर्नाटक पोलीस ध्वज दिन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आयजीपी सतीशकुमार पुढे म्हणाले की, साधारणपणे किमान 30 वर्षे एखादा पोलीस किंवा पोलीस अधिकारी पोलीस दलात सेवा बजावतो. या काळात ते कुटुंबाला किंवा स्वतःला वेळ देऊ शकत नाहीत. 24 तास समाजाच्या रक्षणात, सेवेत व्यग्र राहतात. या काळात पोलीस सेवेशी तादात्म्य पावून काम केल्याने निवृत्तीनंतरही त्यांच्या अंगात पोलिसीवृत्ती भिनलेली असते. त्यामुळे समाजाशी ते लगेच एकरूप होऊ शकत नाहीत.

सेवाकाळात समाजाच्या सेवेत व्यग्र असल्याने स्वतःचे कौटुंबिक प्रहन ते सोडवू शकत नाहीत. निवृत्तीनंतर जेंव्हा ते हे प्रश्न सोडवू पाहतात तेंव्हा सेवारत पोलिसांची मदत लागली तर त्यांना अव्हेरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सेवारत पोलीस आणि समाजाने निवृत्त पोलिसांच्या त्यागाची जाणीव ठेवून सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. निवृत्तीनंतर पोलिसांना एकटे पडल्यासारखे वाटू नये यासाठी पोलीस ध्वज दिनासारखे उपक्रम राबवून, त्यात त्यांना पाहुणे म्हणून बोलावून, विचारपूस, सन्मान करून आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संदेश दिला जातो असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निवृत्त रिझर्व्ह सब इन्स्पेक्टर एम. बी. मुष्टगी म्हणाले की, पोलीस दलात नोकरीची संधी मिळणे प्रतिष्ठेचे मानले पाहिजे. कारण संपूर्ण सेवाकाळात समाजाची सेवा करण्याची संधी यात मिळते. सेवाकाळात पोलीस दलाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे सेवा बजावली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे निवृत्त राखीव सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. ए. किल्लेदार म्हणाले की, पोलीस दलाकडून कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीसारखे राबविण्यात येणारे उपक्रम प्रशंसनीय आहेत. पोलिसांच्या गुणी मुलांचा सन्मान केल्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणात प्रगती करण्यास प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगून याबद्दल खात्याचे आभार मानले.
प्रारंभी पोलीस दलातील विविध तुकड्यानी एसपी मैदानावर शानदार पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. पोलीस बँडच्या तालावर सादर केलेल्या आकर्षक, लयबद्ध पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
समारंभात व्यासपीठावर बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, एसपी डॉ. संजीव पाटील, डीसीपी स्नेहा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments