Belagavi

बेळगावात “अहिंसा रन” मॅरेथॉन स्पर्धेला भव्य प्रतिसाद; विक्रमी 2450 धावपटूंचा सहभाग

Share

विश्वाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक सोहळ्यानिमित्त बेळगावात आज जितो संघटनेतर्फे काढण्यात आलेल्या “अहिंसा रन” मॅरेथॉन स्पर्धेला भव्य प्रतिसाद लाभला. 3, 5 आणि 10 किमी अशा 3 गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये विक्रमी 2450 धावपटूंनी उत्साहात भाग घेतला.

बेळगावातील कॅम्प परिसरातील मराठी विद्यानिकेतन मैदानावर सकाळी 6 वाजता मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कर्नल मनोज शर्मा आणि वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्याहस्ते अहिंसा रनला झेंडा दाखवून चालना देण्यात आली. प्रचंड उत्साहात विविध वयोगटातील धावपटूंनी या रनमध्ये भाग घेतला.

मराठी विद्यानिकेतनपासून महात्मा गांधी चौक, इन्कम टॅक्स ऑफिस रोड, हनुमान नगर सर्कल, हिंडलगा गणपती मंदिर, गांधी चौक, शौर्य चौक, तिम्मय्या रोड, फर्नांडिस रोड, हॅवलॉक रोड, कॅटल रोडमार्गे पुन्हा मराठी विद्यानिकेतन मैदान असा अहिंसा रनचा मार्ग होता. 3 आणि 5 किमी गटातील अहिंसा रनसाठी वेगळा मार्ग होता. समाजाच्या विविध थरातील आणि विविध वयोगटातील स्पर्धकांनी जल्लोषात धावण्याचा आनंद लुटला.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आयोजक विनय बाळीकायी यांनी, आजच्या अहिंसा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. भगवान महावीर जयंतीनिमित्त शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात विक्रमी 2450 अबालवृद्ध धावपटूंनी भाग उत्साहाने घेतला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने व्होट फॉर बेळगाव असा संदेश या उपक्रमातून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बी. एस. चन्नबसप्पा वस्त्र प्रावरणांच्या बीएससी मॉलच्या प्रमुखांनी स्वतः या उपक्रमात सहभागी होऊन धावण्याचा आनंद लुटला. हा उपक्रम बीएससी मॉलने पुरस्कृत केल्याचे सांगून आमच्या टीमदेखील यात सहभागी झाल्या, त्यातून आम्हला आनंद झाल्याचे सांगितले. बीएससी मॉल ही कर्नाटक आणि गोव्यातील एक सर्वात मोठी आघाडीची शोरूम असून, सर्वानी एकदा तेथे भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी हा एक वेगळा आनंददायी अनुभव असल्याची प्रतिक्रिया दिली. सिद्धी मोरे या युवतीने अहिंसा रनमध्ये 3 किमी धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊन वेगळाच आनंद आणि अनुभव मिळाल्याचे सांगितले. आपण स्टॅंडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स क्लबमध्ये रोज 2 तास धावण्याचा सराव करतो, रोज धावण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण स्टॅमिना वाढतो, आत्मविश्वासात वृद्धी होते असे तिने सांगितले.

यावेळी अन्य धावपटूंनीही आपले अनुभव कथन केले.
एकंदर, महावीरांच्या संदेश देण्यासाठी आयोजित या अहिंसा रन उपक्रमाला बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

Tags: