त्या-त्या देशाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब त्या-त्या देशाच्या परराष्ट्र धोरणात उमटते. गेल्या काही वर्षांत राबविलेल्या कणखर परराष्ट्र धोरणामुळे जगात भारताची मान उंचावली असल्याचे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज बेळगावला भेट देऊन व्यावसायिक आणि उद्योजकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी देशाचे परराष्ट्र धोरण, रशिया-युक्रेन युद्ध, युद्धकाळात भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात सुखरूप परत आणण्यासाठी राबविलेले ऑपरेशन गंगा, भारताच्या आग्रहामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करणे आदी अनेक विषयांना स्पर्श केला. 40 वर्षांपूर्वी सनदी सेवेच्या प्रारंभीच्या काळात आपण बेळगावात आलो होतो अशी आठवण त्यांनी सांगितली.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत चीन आणि पाकिस्तान ही भारतापुढील दोन आव्हाने आहेत. चीन लष्करी बळावर आक्रमक धोरण राबवितो तर पाकिस्तान सीमेपलीकडून देशात दहशतवाद प्रसरवण्याचा उद्योग करतोय. पण आम्ही खंबीर व आक्रमक परराष्ट्र धोरण राबविल्यामुळे या दोन्ही शत्रुंना नमते घेण्याची वेळ आलीय. कोरोना काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी ताकदीच्या आधाराने शत्रूला सीमेबाहेर रोखण्यात आपण यशस्वी ठरलो. 2020मध्ये संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली असताना भारताने परराष्ट्र विषयक कठीण पण विशेष निर्णय घेतले.
संपूर्ण जगातील अतिगरीब 100 देशांना भारताने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींचे वितरण केले. त्यामुळे स्वतः संकटात असूनही मदतीला धावणारा परोपकारी मित्र अशी भारताची जगात ओळख निर्माण झाली. युक्रेन-रशिया युद्धाच्या कठीण समयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संयमाने, चातुर्याने चर्चा करून अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना ऑपरेशन गंगा राबवून सुखरूप मायदेशी आणण्यात यश मिळवले असे जयशंकर यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे “इंटरनॅशनल इयर ऑफ द मिलेट” जाहीर केले. त्यामुळंही भारताचा जगात लौकिक वाढल्याचे सांगताना, पंतप्रधान मोदींनी ही संकल्पना मांडल्यावर गेले सुमारे 6 महिने तृणधान्यांचा माझा अभ्यास वाढल्याची मिश्किल टिपणी जयशंकर यांनी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मोदींच्या सूचनेनुसार मी लगेच संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन याची माहिती देऊन संकल्पना समजावून सांगितली. ती मान्य करून राष्ट्रसंघाने लगेचच 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले. भरडधान्ये जगातील बव्हंशी सर्व देशांत सहज उगणारी, कमी पाण्यात, कमी देखभालीत सहजपणे उगतात. सर्वसामान्य शेतकरी ती पिकवतात आणि त्यांचे पोषणमूल्यही उच्च आहे. त्यामुळे भारताची ही संकल्पना संयुक्त राष्ट्रसंघाने उचलून धरल्याचे त्यांनी सांगितले.
देश मजबूत असेल तर त्या देशाचे परराष्ट्र धोरणही मजबूत असते. भारतानेही आपले परराष्ट्र धोरण असेच मजबूत करून परदेशात राहणारे भारतीय नागरिक, विध्यार्थी, पर्यटकांना प्रदेशात सन्मानाची वागणूक मिळेल हे सुनिश्चित केले आहे. यासंदर्भात अनेक परदेशांशी भारताने करारही केले आहेत असे जयशंकर यांनी सांगितले. भारताची लोकसंख्या हे भारताचे सामर्थ्य बनविण्याची किमया पंतप्रधान मोदींनी करून दाखवली आहे. आज अमेरिकेसारख्या देशांकडे अत्याधुनिक, उच्च तंत्रज्ञान आहे, उपकरणे आहेत, पण कुशल अभियंत्यांची त्यांच्याकडे वानवा आहे. असे प्रशिक्षित, कुशल मनुष्यबळ आपल्याकडे आहे ही आपली जमेची बाजू आहे असे ते म्हणाले. जी-20चे अध्यक्षपद भारताकडे येणे हे भारताची पत जगात वाढल्याचे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी देशातील वाढते डिजिटलायझेशन, थिंक टॅंक, प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावरील डिबेट्स, सोशल मीडियाच्या जमेच्या आणि तोट्याच्या बाजू अशा अनेक विषयांवर विचार मांडले. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. भाजपतर्फे हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. भाजपचे राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी सर्वांचे स्वागत केले. राज्य सरचिटणीस महेश टेंगिनकाई यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके उपस्थित होते.


Recent Comments