Belagavi

साखर उद्योगांनी इथेनॉल उत्पादन वाढवून दीर्घकालीन समृद्धी साधावी : आर. नंदकुमार

Share

इथेनॉल उत्पादनाला सरकार प्रोत्साहन देत आहे. या धोरणाचा सकारात्मक लाभ घेत साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढवून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजापेठेतील निर्यातीच्या संधींचा लाभ घेत दीर्घकालीन समृद्धी साधावी असे आवाहन सिस्टाचे अध्यक्ष आर. नंदकुमार यांनी केले.

बेळगावातील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये द साऊथ इंडिया शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (सिस्टा) सहकार्याने, ‘विद्यमान परिस्थितीत भारतीय साखर उद्योगाला इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. त्याच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. आर. नंदकुमार पुढे म्हणाले की, इंधनाच्या बाबतीत दुसऱ्या देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारने देशांतर्गत इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण अंगिकारले आहे.

साखर उद्योगाची सर्व सूत्रे सरकारच्या हातात असली तरी, साखर उद्योगांनी या धोरणाचा लाभ घेत दीर्घकाळासाठी आपला आर्थिक लाभ निश्चित करण्यासाठी साखरेसह इथेनॉल आणि अन्य जैव इंधने, पूरक उत्पादने घेऊन निर्यात वाढवली पाहिजे. भारतीय साखरेची गुणवत्ता जागतिक पातळीवर स्वीकारार्ह ठरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढत आहेत. अशा शेतीत साखरेची निर्यात करण्याबरोबरच इथेनॉलसारखी पूरक उत्पादने घेऊन त्यांच्या निर्यातीवरही साखर उद्योगांनी भर देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आर. बी. खांडगावे यावेळी संबोधित करताना म्हणाले की, 2018 मध्ये अन्य देशांप्रमाणेच भारत सरकारनेही जैव इंधन धोरण अमलात आणले आहे. इंधन पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या देशांवरील अवलंबित्व कमी करून परकीय चलन वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार इथेनॉलसह अन्य जैव इंधनांच्या उपलब्धतेला आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. इंधनात 12% ब्लेंडींगला अनुमती देण्यात आली आहे. भारतीय साखर उद्योगासाठी ही पर्वणी आहे. त्यामुळे या उद्योगांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी संशोधन, आविष्काराच्या माध्यमातून जैव इंधनाच्या निर्मितीला चालना दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून परिसंवादाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी रीग्रीन एक्सेल ईपीसी प्रा. लि.चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर संजय देसाई, पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडूपाटील, नंदी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शशिकांतगौडा पाटील, सी. बी. कोरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मल्लिकार्जुन कोरे, गोदावरी बायो रिफायनरीचे कार्यकारी संचालक बी. के. बक्षी यांच्यासह साखर उद्योगातील अनेक तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते.

Tags: