Hukkeri

आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ हुक्केरीत मुस्लिमांची निदर्शने

Share

राज्यातील मुस्लिम समाजाला असलेले 2 बी आरक्षण राज्यातील भाजप सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ हुक्केरी शहरातील तमाम मुस्लिम बांधवांतर्फे तालुका प्रशासन इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले.

नुकतेच राज्य सरकारने मुस्लिमांसाठीचे 2 बी आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी शहरातील ग्यारह जमातीच्या सदस्यांनी आंदोलन करून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आरक्षण चालू ठेवण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना राजू नदाफ म्हणाले की, राज्य सरकारने मुस्लिमांचे 2बी आरक्षण रद्द करून भारताच्या पवित्र संविधानाचा अनादर केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा सर्व मुस्लिम निषेध करतात. महामहिम राज्यपालांनी यात हस्तक्षेप करून आपल्या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

त्यानंतर आंदोलकांनी तहसीलदार एस. बी. इंगळे यांना राज्य निवेदन दिले.
यावेळी शब्बीर सनदी, बाबाजान काझी, निसार अहमद बागवान, सलीम कलावंत, इर्शाद मोकाशी, मल्लिक कबीर, नजीर मोमीनदादा, सलीम नदाफ, युसुप खंडायत, आदम खानझादे, इम्रान मोमिन, शहाजहान बडगावी, डी. आर. काझी आदी जमात सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, हुक्केरी मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी दिलेले निवेदन राज्यपालांना पाठवून देण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

Tags: