Belagavi

जिल्ह्यात भाजपच्या 13 जागा राखण्याचा प्रयत्न : भालचंद्र जारकीहोळी

Share

गेल्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यात भाजपने 10 तर काँग्रेसने 8 मतदारसंघात विजय मिळवला होता. ऑपरेशन कमळच्या माध्यमातून तीन आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या 13 जागा राखण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती केएमएफ अध्यक्ष आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना केएमएफ अध्यक्ष आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की, आज बूथ लेव्हलवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उमेदवारी देण्याबाबत मते जाणून घेण्यात येत आहेत. मला वाटते की ही एक चांगली व्यवस्था आहे. यामुळे मतदारसंघातील मतभेद कळतील. आमदार कार्यकर्त्यांशी बरोबर वागतात की नाही, हे कळेल. सर्व्हे बेस ठेवून तिकीट वाटप करण्यात येत आहे. अथणी मतदारसंघात सवदी विरुद्ध रमेश जारकीहोळी संघर्षबाबत बोलताना आ. भालचंद्र म्हणाले, सर्वच पक्षात अनेक इच्छुक आहेत

तिकीट निश्चित झाल्यानंतर असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण हायकमांड काय निर्णय घेते ते सर्वांनी मान्य करावाच लागतो. हायकमांडने रमेश आणि सवदी यांच्याशी चर्चा केली असावी. सर्वेक्षणाच्या आधारे 18 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले जातील. हायकमांडने जाहीर केलेला उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. हायकमांड काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करेल. निवडणूक सुरळीत पार पडावी, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक पक्षात दुफळीचे राजकारण, मतभेद आहेत. सर्व काही वरिष्ठांकडून निराकरण केले जाते असे ते म्हणाले.

मी काही प्रसारमाध्यमांवर दुफळीचे राजकारण सुरु असल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. पण वस्तुस्थितीचा विपर्यास करून त्या दाखविल्या आहेत. बाहेरून येऊन कोणीही कोणाला हरवू शकत नाही किंवा जिंकूनही आणू शकत नाही, जे ते त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात मजबूत आहेत. पराभव आमच्या बाजूने नाही. मतदारसंघातील जनतेमुळेच पराभव आणि विजय शक्य आहे. बाहेरचे लोक येऊन पराभव करू शकत नाहीत. पक्षाच्या हितासाठी प्रतिष्ठा नसावी. दुसऱ्यांदा आम्ही सवदी, रमेश आणि जोल्ले यांना विनंती करतो. मी बंगळुरू येथील कोअर कमिटीच्या बैठकीत आवाहन करणार आहे. निवडणुकीला अवघे ४० दिवस उरले आहेत. सर्व मतभेद विसरून काम केले पाहिजे. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणी आपसात लढू नये हीच प्रत्येकाची इच्छा आहे. सर्वांना एक करूया असे आम्ही तीन-चार नेत्यांना आवाहन करतो.

भाजप सरकारने सर्व समाजाला योग्य आरक्षण दिले आहे. सर्व समाज भाजपसोबत आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्ह्यातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आमदार एन. वाय. गोपालकृष्ण यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना, ते काँग्रेसमधून आले आणि परत गेले. अद्याप अन्य कोणीही पक्ष सोडलेला नाही. विजयी होणारा पक्ष सोडण्यास कोण तयार आहे? किती जागा मिळतील याचे भाकीत करणार नाही, पण राज्यात आमचीच सत्ता येईल हे निश्चित आहे. मी सुरेश अंगडी यांच्याबद्दल आधीच अचूक भाकीत सांगितले होते. आता काही सर्वेक्षणांचे भाकितं येत आहेत. आता आरक्षण आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. 25 एप्रिलला सर्व काही स्पष्ट होईल. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. येडियुरप्पा यांना बाजूला करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना केंद्रस्थानी दोन महत्वाची पदे दिली आहेत. त्यांना साइड लाइन करण्याचा प्रश्नच येत नाही असे आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

एकंदर येत्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील भाजपच्या १३ जागा राखण्याचा प्रयत्न करू असे आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

Tags: