Belagavi

कुऱ्हाडीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना सश्रम कारावास, दंड

Share

बैलगाडीतून पाण्याच्या घागरी घेऊन जाताना पूर्ववैमनस्यातून एकावर कुऱ्हाडीने घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. मुस्तफा हुसेन सय्यदजी यांनी हा निकाल दिला.

याबाबत आपली मराठीला माहिती देताना सरकारी वकील मुरलीधर एल. कुलकर्णी यांनी सांगितले की, रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावात असलेल्या गडदेश्वर मठाच्या सीबीएससी शाळेजवळ 16-06-2019 रोजी सकाळी 08-30 वाजता नागप्पा चिप्पलकट्टी बैलगाडीमध्ये पाण्याच्या घागरी घेऊन जात असताना आरोपी इरण्णा रंतप्पा नायकर आणि शंकरप्पा यल्लापा नायकर या दोघांनी त्याला पकडून कुऱ्हाडीने घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत नागप्पाची पत्नी गौरव्वा नागप्पा चिप्पलकट्टी हिने फिर्याद दिली होती. त्यानुसार कटकोळ कुऱ्हाडीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीएसआय विजय कांबळे, यमनाप्पा मांग, शरणेश जालिहाळ यांनी तपास करून शासनाच्यावतीने मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अभियोक्ता मुरलीधर एल. कुलकर्णी यांनी सदर प्रकरणाचे संचालन व युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा. न्यायाधीश मुस्तफा हुसेन सय्यदजी यांनी आरोपी इरण्णा रंतप्पा नायकर आणि शंकरप्पा यल्लापा नायकर या दोघांना प्रत्येकी 29-03-2023 रोजी 1 वर्षाची शिक्षा आणि रु. 1250/- दंड ठोठावला आहे.

Tags: