Belagavi

दूषित पाण्यामुळे मार्कंडेय नदीकिनाऱ्यावरील पिके धोक्यात

Share

बैलूर येथे उगम पावून , होनग्यापर्यंतच्या शेतकऱ्यांना जीवनदायिनी ठरलेली मार्कंडेय नदी , आता दूषित बनली आहे . शहरी उपनगरातील सांडपाणी या नदीत वाहून येत असल्याने , या नदीच्या पाण्यावर पिकणाऱ्या पिकांचे उतपादन घटले आहे . उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे .

होय.. आपण जी पाहत आहात ती हीच मार्कंडेय नदी … पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी आपल्या किनाऱ्यावरील शेतकऱ्यांचे पर्यायाने जनतेचे जीवन समृद्ध करणारी ही नदी .. मात्र आता या नदीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे . नदीपात्रात टाकण्यात येणार कचरा आणि शहरच्या उपनगरी भागाचे सांडपाणी या नदीत येऊन मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित बनले आहे .

पर्यायाने याचा परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनांवर होऊ लागला आहे . बदलत्या नैसर्गिक स्थितीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे . शिवाय नैसर्गिक आपत्तीबरोबरच , आता ह्या शेतकऱ्यांना मानवनिर्मित आपत्तीलादेखील तोंड द्यावे लागत आहे . अतिशय मेहनत करून , लागवड केलेल्या पिकाचे उत्पादन या दूषित पाण्यामुळे घटत चालले आहे . यासंबंधी , कंग्राळी खुर्द येथील पुंडलिक पाटील या शेतकऱ्यानी आपली मराठीला वस्तुस्थिती सांगितली . ते म्हणाले कि पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे , नदीच्या दोन्ही काठावरील शेती पाण्याखाली जाऊन पीक कुजते किंवा नदीप्रवाहाबरोबर वाहून जाते . पुन्हा दुबार पीक घेण्याइतपत शेतकऱ्यांची परिस्थिती राहिलेली नसात . आणि उन्हाळ्यात , केएलई , हनुमान नगर , सह्याद्रीनगर , सदाशिव नगर भागातील सांडपाणी , नदीच्या पाण्यात मिसळून , नदीतच पाणी दूषित होत आहे . त्यामुळे या पाण्यावर पिकवल्या पिकांचे उत्पादन घटले असून , उत्पादन खर्च देखील निघत नाही . शिवाय नदी किनाऱ्यावरील शेतजमीन नापीक बनली आहे . यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे . संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन, बळीराजाला वाचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली .

त्याचप्रमाणे , मार्कंडेय नदीत उपनगरातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून , हे पाणी फिल्टर करून मगच सोडावे , संबंधितांनी याची नोंद घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी देखील पुंडलिक पाटील यांनी केली .

शिवाय कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीच्या पुलाखाली तर कचरा डेपो बनला आहे . महानगर पालिकेची कचऱ्याची गाडी नियमित येत नसल्याने ज्योतीनगर, रामनगर, मार्कंडेय नगर , आणि अन्य वसाहतीतील लोक , या नदीच्या पुलाखाली आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकून जात आहेत . नदीपात्रात प्लास्टिक, जुने कपडे, घरातील मोडकेतोडके सामान , आणि अन्य घाण कचरा आणून टाकला जात आहे . यामुळे नदी पात्राला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे . यामुळे या नदीपात्र आणि या भागातील रस्ते गलिच्छ बनले आहे . नागरिकांनी कचरा असा नदीपात्रात टाकू नये यासाठी कंग्राळी ग्राम पंचायत पाळत ठेऊन असते तरीदेखील लोक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्रात कचरा आणून टाकत आहेत .

Tags: