कल्याण कर्नाटक अर्थात उत्तर कर्नाटक भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. कित्तूर-धारवाड दरम्यान स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन तयार करून एफएमसीजी औद्योगिक वसाहत उभारण्याला मंजुरी दिली असून, त्यातून एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
बेळगावातील सुवर्णसौधच्या आवारात वीर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्यांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळेच कित्तूर कर्नाटक भागाच्या विकासाला आम्ही प्राधान्य दिले. या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र निगम स्थापन करून 5500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. येथील पाटबंधारे योजना पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. मागील सरकारने याबात केवळ पोपटपंची केली. मात्र आम्ही कृती करून दाखवली. कळसा-भांडुरी प्रकल्पाचा डीपीआर तयार केला असून येत्या एक-दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल असे बोम्मई म्हणाले.
बोम्मई पुढे म्हणाले की, कित्तूर-कर्नाटक प्रदेशाच्या विकासासाठी कित्तूर-धारवाड दरम्यान स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनला मंजुरी देण्यात आली आहे. या भागात वेगाने खपणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या (एफएमसीजी) उद्योगांची वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यातून एक लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. हुबळी-धारवाड येथे जयदेव हृदयरोग विज्ञान संस्था मंजूर केली असून बेळगावला किडवाई कॅन्सर हॉस्पिटल मंजूर करून आमच्या सरकारने समतोल साधला आहे. तुमच्या घामातून, कष्टातूनच नव कर्नाटकाची आणि पर्यायाने नवभारताची निर्मिती होणार आहे. आज सुवर्णसौधच्या प्रांगणात तीन महान व्यक्तींच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले आहे. त्यांचा आदर्श ठेवून काम करूयात असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ हेगडे-कागेरी म्हणाले की, डिसेम्बरमध्ये सुवर्णसौधमध्ये झालेल्या अधिवेशनात सभागृहात महात्मा गांधी, बसवण्णा, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर आदी महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. आता सुवर्णसौधच्या आवारात राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा आणि डॉ. आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले ही अभिमानाची बाब आहे. सुवर्णसौधच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं आजचा दिवस आहे. अत्यंत कमी वेळेत मुख्यमंत्री बोम्मई, मंत्री सी. सी. पाटील आणि त्यांच्या बांधकाम खात्याने हे करून दाखवले त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. आता आम्हा लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे. या महान प्रभूतींचा आदर्श समोर ठेवून, त्यांची प्रेरणा घेऊन लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे असे कागेरी म्हणाले.
विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून कमीतकमी अवधीत महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रारंभी मुख्यमंत्री बोम्मई यांनी कळ दाबून राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. याप्रसंगी बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, महसूल मंत्री आर. अशोक, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, साखर मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प, उद्योग मंत्री मुरुगेश निराणी, आ. अभय पाटील, अनिल बेनके, महादेवप्पा यादवाड, महांतेश दौडगौडर, पी. राजीव आदी उपस्थित होते.


Recent Comments