Belagavi

हिंदवाडी श्री महालक्ष्मी मंदिरात तिसऱ्यांदा चोरी

Share

बेळगावातील हिंदवाडीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात तिसऱ्यांदा चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरटयांनी देवीच्या माथ्यावरील चांदीचे छत्र, प्रभावळ, सुमारे 4 किलो वजनाची चांदीची पट्टी असा सुमारे 7 किलो वजनाचा चांदीचा ऐवज चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेळगावातील उपनगर हिंदवाडीतील श्री महालक्ष्मी मंदिर हे या परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आजूबाजूला बऱ्यापैकी लोकवस्ती असलेल्या या मंदिरात तब्बल तिसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने भाविकांना धक्का बसला आहे. आज सकाळी मंदिराचे पुजारी नित्य पूजेसाठी आले असता, त्यांना चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी लगेचच मंदिराच्या ट्रस्टींना फोन करून याची माहिती दिली. ट्रस्टींनी पुजाऱ्यांसमवेत मंदिरात पाहणी केली असता, महालक्ष्मी देवीच्या सिंहासनाला लावलेली चांदीची जाड नक्षीदार पट्टी, डोक्यावरील चांदीचे छत्र आदी सुमारे 7 किलो वजनाचा चांदीचा ऐवज चोरल्याचे दिसून आले आहे.

मंदिराच्या ट्रस्टींनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक दयानंद शेगुणसी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना मंदिराच्या ट्रस्टी सुमती कुदळे यांनी सांगितले की, 48 वर्षांपूर्वी हिंदवाडी महिला मंडळाने या मंदिराची स्थापना केली असून तेंव्हापासून मंडळाच्या व्यवस्थापनाखालीच मंदिर आहे. काल रात्री चोरी झाली असावी, चोरटयांनी देवीचा मुगुट छत्र, सिंहासनाला लावलेली चांदीची सुमारे 4 किलो वजनाची चांदीची नक्षीदार पट्टी आदी सुमारे 7 किलो चांदीचा ऐवज चोरला आहे. त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटले आहे. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा छडा लावून मंदिराचा ऐवज परत मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, प्रभाग क्र. 29चे नगरसेवक नितीन जाधव यांनीही मंदिराला भेट देऊन पाहणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, या मंदिरात यापूर्वी दोनवेळा चोरी झाली असून आता तिसऱ्यांदा चोरी झाली आहे. यापूर्वीच्या चोरीसंदर्भात तक्रार देऊनही काहीच निष्पन्न झाले नाही. निदान आता तरी या तिसऱ्या चोरीचा छडा पोलिसांनी लावून दोषींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मंदिरात चोरी झाल्याने भाविकांना विशेषतः महिलांना धक्काच बसला. माजी नगरसेविका जांगळे यांच्यासह महालक्ष्मी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. टिळकवाडी पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा माग घेत आहेत.

Tags: