मुस्लिम समाजाचे 2-बी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन छेडण्यात आले. सरकारने आपला निर्णय मागे घेईपर्यंत उग्र आंदोलन सुरूच ठवेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
बसवराज बोम्मई सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुस्लिम समुदायाला असलेले 2-बी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण आता लिंगायत पंचमसाली आणि वक्कलिग समाजाला देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्यभरात तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आज आंदोलन छेडण्यात आले. शहरातील चन्नम्मा चौकापासून राज्य भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष सलीम खतीब यांनी सांगितले की, बोम्मई सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुस्लिम समुदायाचे 2-बी प्रवर्गांतर्गत असलेले 4% आरक्षण रद्द करण्याचा असंवैधानिक निर्णय घेतला आहे. हे आरक्षण रद्द करून लिंगायत पंचमसाली आणि वक्कलिग समाजाला विभागून देण्यात आले आहे.
त्याचा या दोन्ही समाजानी विरोध केला आहे. आमचे आरक्षण रद्द करण्याला आमचा तीव्र विरोध आहे. म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे निदर्शने करून आंदोलन छेडले आहे. ही तर सुरवात आहे, आमच्या समुदायाचे, पक्षाचे आमदार, विधान परिषद सदस्य बेंगळूर येथे बैठक घेऊन पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविणार आहेत. सरकारने आपला निर्णय रद्द करेपर्यंत आम्ही उग्र आंदोलन करत राहू असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात मुस्लिम समुदायाचे आरक्षण रद्द करू नये या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments