Belagavi

बेळगावात युवा वकिलाला मारहाण; वकिलांचे रास्ता रोको आंदोलन

Share

पोलिसांनी युवा वकिलाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज वकील संघटनेच्या वतीने कोर्टासमोर रस्ता रोको करून जोरदार निदर्शने करण्यात आली. यापुढे असे प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

मूळचे रामदुर्गचे व सध्या बेळगावात वकिली करणारे इरण्णा पुजारी हे युवा वकील आपल्या पत्नीला दवाखान्यात ऍडमिट करून आपले वाहन सटेशनच्या मागे लावून काही वेळात येणार होते. त्यावेळी एका महिला पोलिसाने त्यांना आक्षेप घेत वाहन काढण्यास सांगितले. पुजारी यांनी त्यांना लगेचच येतो असे सांगूनही ती महिला पोलीस अंगावर आली, तिच्या समवेत दोन पुरुष पोलिसांनी पुजारी यांना पकडून मारहाण केली असा आरोप करत वकिलांनी आंदोलन छेडले. जेएमएफसी कोर्टासमोर रस्त्यावर जमून वकिलांनी निदर्शने केली. वकिलांच्या रास्ता रोकोमुळे या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागून काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. ती निस्तरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ वकील आर. पी. पाटील यांनी वकिलाला मारहाणीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. घटनाक्रम सांगून ते म्हणाले की, बेळगावात पोलिसांची मुजोरी सुरु असून वरचेवर वकिलांना पोलिसांकडून मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. आठच दिवसांपूर्वी शहापूर येथे एका महिला वकिलाला पोलिसांनी मारहाण केल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. ऍड. पुजारी यांना सीईएन सेलच्या दोन पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याने त्या जबर दुखापत झाली आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालय झाल्यापासून बेळगावात पोलिसांनी हिट्लरशाही सुरु केली आहे. ते नेमकी कोणाची नोकरी करताहेत समजत नाही.

या दरम्यानच ऍड. पाटील यांना पोलीस आयुक्तालयातून माफी मागणारा फोन आला. फोनवर बोलून पत्रकारांना माहिती देताना ऍड. पाटील यांनी, पोलीस आयुक्तालयातून माफी मागणारा फोन आल्याचे सांगितले. पण आधी चूक करून नंतर माफी मागण्यात काय अर्थ आहे असा सवाल करून ऍड. पुजारी यांना मारहाण केलेल्या पोलिसांनी त्यांची माफी मागावी, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करून भविष्यात असे प्रकार घडल्यास वकील गप्प राहणार नाहीत, याहून अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान सीपीआय आणि डीसीपी शेखर यांनी आंदोलक वकिलांची भेट घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र वकील त्याला बधले नाहीत. त्यानंतर वकील संघटनेच्या कार्यालयात मारहाण करणाऱ्या दोन पोलिसांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल वकिलांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.
एकंदर बेळगावात पोलीस आणि वकील यांच्यातील संघर्ष वरचेवर पहायला मिळत आहे. तो कधी थांबणार याची प्रतीक्षा करावी लागेल.

Tags: