जगातील सर्वच धर्मानी “सेवा परमो धर्म” हा संदेश दिलाय. निस्वार्थ भावनेने समाजसेवा केल्यास ईश्वर त्याचे फळ जरूर देतो. याच संदेशाचे पालन सर्वानी करणे गरजेचे आहे असे आवाहन गदग डंबळ तोंटदार्य संस्थानमठाचे डॉ. तोंटद सिद्दराम स्वामीजी यांनी केले. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनच्या शानदार उदघाटन सोहळ्यात आशीर्वचन देताना ते बोलत होते.
आपल्या समाजकार्याची व्याप्ती आणखी वाढविण्याच्या हेतून बेळगाव महानगर भाजप सरचिटणीस ऍड. मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनची स्थापना केली आहे. त्याचा उदघाटन समारंभ देसाई लॉनमध्ये पार पडला. यावेळी आशीर्वचन देताना डॉ. सिद्दराम स्वामीजी पुढे म्हणाले, समाजसेवेत एक आगळे समाधान असते. समाजातील गोरगरीब, वंचितांची सेवा करावी, पण ती दुसऱ्याला कळू देऊ नये, असा संदेश विश्वगुरू बसवण्णा यांनी दिला आहे.

भगवद्गीतेत श्रीकृष्णाने देखील ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन’ असा संदेश दिलाय. निष्काम मनोभावनेने सेवा केल्यास ईश्वर त्याचे फळ जरूर देतो. याच संदेशाचे पालन करत मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनने वाटचाल करावी, त्यांना त्याचे फळ नक्कीच मिळेल अशा शुभेच्छा स्वामीजींनी दिल्या. अनेक श्रीमंत लोक ऐपत असूनदेखील दुसऱ्यांचा विचार करत नाहीत, समाजसेवा करत नाहीत. पण मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी वैयक्तिकरित्या स्वच्छता मोहिमा, शाळा सुधारणा, कोरोना काळात वंचितांना मदत, कोरोना वारियर्सचा सत्कार अशी अनेक सामाजिक कामे केली आहेत. लहान वयातच त्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतलाय. त्यांचे हे कार्य अभिनंदनीय आहे. फौंडेशनमुळे त्यांच्या कामाला व्यापक वाव मिळेल. त्यांना सर्वांच्या शुभेच्छा मिळोत अशा शुभेच्छा सिद्दराम स्वामीजींनी दिल्या.
यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले की, मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनची स्थापना आज स्वामीजींच्या उपस्थितीत होत आहे ही समाधानाची बाब आहे. स्वतःचे भले झाले की पुरे, समाज जाऊ दे खड्ड्यात अशी आजची परिस्थिती आहे. मात्र मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी त्याला छेद देत आधी वैयक्तिकरित्या आणि आता संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा चालवली आहे. वैयक्तिकरित्या सेवा करण्याला काही मर्यादा येतात, संस्थेच्या माध्यमातून समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येते, त्यांच्या गरजा पूर्ण करता येतात. प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा देणं ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असली तरी सगळे काही सरकारनेच केले असते तर आपण आज इतपत प्रगती गाठू शकलो नसतो. समाजातील अनेक दानशूर, सेवाभावी संस्थांनी गरजू, वंचितांना केलेल्या मदतीमुळेच देशाची प्रगती शक्य झाली आहे. आपला देश खंडप्राय आहे. मोठ्या लोकसंख्येच्या या देशात एक मोठा वर्ग अजूनही मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यांची सेवा करण्याला मोठा वाव आहे. अशा सेवेच्या संधी ओळखून मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनने कार्य करावे असे सांगून खा. कडाडी यांनी मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनला शुभेच्छा दिल्या.
भाजप राज्य प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली म्हणाले की, मुरुगेंद्रगौडा पाटील आधीपासूनच समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहेत. फौंडेशनची स्थापना करून व्यापक समाजसेवा करण्यास ते आता पुढे सरसावले आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे. समाजसेवा, राजकारण, धार्मिक कार्य अशा क्षेत्रात ते एक उगवते नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या नव्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा व सहकार्य राहील.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ऍड. मुरुगेंद्रगौडा पाटील म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने मी समाजसेवेत सक्रिय झालो. शहर परिसरातील शाळांची, मंदिरांची स्वच्छता मोहीम, क्रीडास्पर्धांचे आयोजन, युवा वर्गासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. अनेक लोकांनी, हितचिंतकांनी माझ्या कार्याची दखल घेऊन ते अधिक व्यापक होण्यासाठी संस्थेची स्थापना करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आता मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनची स्थापना केली आहे. यापुढे शक्तीच्या पलीकडे जाऊन समाजाची सेवा करणार आहे. या निर्णयाला आपले पाठबळ आणि शुभेच्छा राहोत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. प्रारंभी सिद्दराम स्वामीजी, नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, कारंजीमठाचे गुरुसिद्धस्वामीजी, खा. इरण्णा कडाडी, ऍड. एम. बी. जिरली आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुरुगेंद्रगौडा पाटील फौंडेशनची स्थापना करण्यात आली.
मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी स्वामीजींसह मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी रा. स्व. संघाचे नगर संचालक व लिंगायत नेते बाळाण्णा कग्गनगी, शंकर गुडस यांच्यासह बेळगाव शहर व परिसरातील मुरुगेंद्रगौडा पाटील यांचे विविध जाती-धर्माचे हजारो समर्थक, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments