बेळगावातील कणबर्गी मुख्य रस्ता परिसरातील अंजनेय नगर, रुक्मिणी नगर, रेणुका नगर भागातील रस्त्यांची व भुयारी गटारींची कामे रखडल्याने येथील रहिवाशी आणि व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर ही कामे पूर्ण न केल्यास महापालिका आणि स्मार्टसिटी कंपनीच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
होय, बेळगावातील कणबर्गी मुख्य रस्ता परिसरातील अंजनेय नगर, रुक्मिणी नगर, रेणुका नगर ही प्रमुख उपनगरं बनली आहेत. येथे अनेक व्यवसाय आणि रहिवाशी वस्ती आहे. येथून कणबर्गीला जोडणाऱ्या रस्त्याचे तसेच ड्रेनेज लाईन घालण्याचे काम हाती घेऊन सुमारे 6 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र संथगतीने सुरु असलेले हे काम अद्यापही पूर्ण केले नसल्याने येथील रहिवाशी आणि व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात महानगर पालिका, स्मार्टसिटी, एल अँड टी कंपनी आमदार आणि नगरसेवकांबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. या सर्व संबंधितांनी आमच्या समस्यांची त्वरित दखल घेऊन ही सर्व नागरी विकासाची कामे त्वरित पूर्ण करावीत अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय.
या संदर्भात स्थानिक गॅरेज चालक प्रसाद यांनी ‘आपली मराठी’सोबत बोलताना सांगितले की, अंजनेय नगर येथील अय्यप्पा मंदिर परिसरात स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत 6 महिन्यांपूर्वी भूमिगत ड्रेनेज वाहिन्या जोडणे आणि रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ते अतिशय संथगतीने सुरु आहे. 4 महिन्यांपूर्वी रस्त्यात खड्डा खोदून ड्रेनेज लाईन घालण्याचे काम हाती घेतले आहे. पण तेथे कोणतीच खबरदारी घेण्यात न आल्याने नागरिकांना धोका वाढला आहे. एका बाजूचा रस्ता बंद करून काम अर्धवट सोडल्याने धूळ पसरत आहे. या ठिकाणी एक नव्या बाइक्सची शोरूम, गॅरेजीस, एमिशन चेकिंग सेंटर व अन्य व्यवसाय आहेत. त्यांना व त्यांच्या ग्राहकांना धुळीचा व रस्ता बंद केल्याचा त्रास होत आहे. अंडरग्राउंड ड्रेनेजसाठी अंडरग्राउंड ड्रिलिंग मशीन येणार आहे असे सांगून अनेक दिवस लोटले तरी त्या मशीनचा पत्ताच नाही. रस्त्यावर, फुटपाथवर खड्डे खोदल्याने पावसाळ्यात पाणी साचून व्यवसाय चालवणे कठीण होणार आहे. आमच्या समस्यांकडे महानगर पालिका, स्मार्टसिटी, एल अँड टी कंपनी आमदार आणि नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
आणखी एका रहिवाशाने सांगितले की, 6 महिन्यांपूर्वी रस्ता बंद ठेवून संथगतीने काम सुरु केले आहे. सिंगल रोडवर वाहतूक सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना खास करून शाळा-कॉलेजला जाणारे विध्यार्थी, महिला आणि वृद्धांना अडचण येत आहे. स्मार्टसिटीतून कामे होत आहेत हे खरे असले तरी ज्या संथ गतीने ती सुरु आहेत हे चुकीचे आहे. आमदार बेनके निवडणुकीत बिझी असतील पण त्यांनी तातडीने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देऊन आम्हाला दिलासा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आणखी एका रहिवाशाने स्मार्टसिटी अधिकाऱ्यांच्या बद्दल संतप्त प्रतिक्रिया दिली. सिंगल रोडवर वाहतूक सुरु आहे. येथे वाहने वेगाने येतात, कोणाला अपघात झाल्यास कोण जबाबदार? असा सवाल करून ते टाळण्यासाठी रस्त्याचे का त्वरित पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली. रस्त्याचे डांबरीकरण करतो म्हणून कणबर्गी रोडवर खड्डेच खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. पण काम पूर्ण केलेले नाही. लवकर काम पूर्ण न केल्यास येथील रहिवाशी उग्र आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिला.
एकंदर, स्मार्टसिटीच्या नावाखाली बेळगावात विकासकामे सुरु असली तरी ती वेगाने पूर्ण होत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निवडणुकीमुळे कामे खोळंबण्याच्या भीतीने नागरिक आक्रोश करत आहेत. त्याची स्मार्टसिटी अधिकारी कधी दखल घेणार हे पाहावे लागेल.


Recent Comments