Belagavi

कर सल्लागारांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Share

कर्नाटक राज्य कर सल्लागार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजित कर सल्लागारांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला आज बेळगावातील युनियन जिमखाना मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला.

होय, कर्नाटक राज्य कर सल्लागार संघटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बेळगाव जिल्हा कर सल्लागार संघटनेतर्फे बेळगावातील युनियन जिमखाना मैदानावर राज्यातील कर सल्लागारांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. यजमान बेळगावसह एकूण राज्यातील 12 कर सल्लागार जिल्हा संघटनांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सकाळी या स्पर्धेचा उदघाटन सोहळा पार पडला.

युनियन जिमखाना मैदानावर आयोजित कर सल्लागार क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याला भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील, जीएसटी कर खात्याचे संयुक्त संचालक रमेशबाबू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उभयतांनी विविध संघांच्या खेळाडूंची ओळख करून घेतली. मुरगेंद्रगौडा पाटील यांच्याहस्ते नाणेफेक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी व रमेशबाबू यांनी बॅटिंग करून स्पर्धेचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील यांनी, कर सल्लागारांनी वेळात वेळ काढून विरंगुळ्याचे चार क्षण अनुभवण्यासाठी कर सल्लागारांच्या या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. भविष्यातही असेच उपक्रम राबवा, त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य देऊ असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जीएसटी कर विभागाचे संयुक्त संचालक रमेशबाबू म्हणाले, कर सल्लागारांचे दैनंदिन काम खूप व्यस्त आणि किचकट असते. कर खाते आणि कर सल्लागारांचे जवळचे नाते आहे. आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन कामात कर सल्लागारांची मोठी मदत होते. त्यामुळे त्यांच्या कामाची आम्हाला कल्पना आहे. अशा व्यस्त वेळापत्रकातून त्यांना काही क्षण निवांत अनुभवता यावेत यासाठी हा उपक्रम आयोजित करणे प्रशंसनीय आहे. अशा उपक्रमांत आमच्या अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घ्या असे आवाहन करून यासाठी सर्व सहकार्य देऊ असे त्यांनी सांगितले.

उदघाटन सत्रानंतर विविध जिल्ह्यांच्या संघांत किर्केट सामने झाले. यावेळी बेळगाव जिल्हा कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष जितेश कब्बूर, उपाध्यक्ष भरतेश मुरगुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत यजमान बेळगावसह बेंगळूर, धारवाड, गदग, हासन, म्हैसूर, विजापूर, बागलकोट आदी एकूण 12 जिल्हा कर सल्लागार संघटनांच्या संघांनी भाग घेतला आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असून सेमी फायनल आणि फायनल मॅचेस होणार आहेत.

Tags: