Belagavi

शेतकऱ्यांनीच संघटित होऊन आपल्यावरील अन्याय रोखावा : राजू शेट्टी

Share

राज्यात किंवा देशात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत, उलट शेतकऱ्यांवर अन्यायच केला जातो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच संघटित होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती मिळवणे गरजेचे आहे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते संबोधित करत होते. राजू शेट्टी पुढे म्हणाले, सगळेच राजकीय पक्ष, त्यांचे मंत्री, आमदार शेतकऱ्यांची विकासाच्या नावाने भावनिक फसवणूक करत आहेत. बेळगावतही तेच सुरु आहे. रिंग रोड, सांडपाणी प्रकल्प आदी विकासकामांच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन काढून घेतली जाते. याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना विरोध केल्यास उद्योग कसे उभारणार? उद्योग आले नाहीत तर रोजगार कसे निर्माण होणार असे भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केले जाते. अशावेळी ज्यांची जमीन जात नाही ते शेतकरी बघत राहतात. पण ज्यांची जमीन जाते ते जात्यात आणि सध्या जात नाहीत ते सुपात इतकाच फरक आहे. आज ना उद्या तुमचीही जमीन जाणार आहे हे लक्षात ठेवून सरकारकडून होणाऱ्या भू संपादनाला सर्वच शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्याला संबोधित करताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, विविध सरकारी प्रकल्पांच्या नावाखाली बेळगाव व परिसरातील गावच्या शेतकऱ्यांची सुपीक जमीन घशात घालण्याचं काम सरकार गेली काही वर्षे करत आहे. त्याला कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने आजवर विरोध केलेला नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत अशाना आपण पाठिंबा द्यायचा का याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. मजगावमध्ये दमदाटी करून एका लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांची १४० एकर जमीन गिळली. त्या शेतकऱ्यांना आता पश्चाताप होतोय. त्या लोकप्रतिनिधीला निवडून देऊन आपण चूक केली अशी कबुली ते आता देत आहेत. पण आता त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत जर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेद्वारांऐवजी राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून आले तर तुमच्या जमिनी शिल्लक राहणार नाहीत याची जाणीव ठेवा. राष्ट्रीय पक्षांची ही भूमिका ओळखून शेतकऱ्यांनी येत्या निवडणुकीत म. ए. समितीच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केला.

बेळगुंदीतील कलमेश्वर युवक मंडळाच्या वतीने आयोजित बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर हा शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यात प्रारंभी राजू शेट्टी यांच्याहस्ते रयतेचा जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.

मेळाव्यात माजी आमदार आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक केले. मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर, लक्ष्मणराव होनगेकर, चंदगड तापंचे माजी सभापती जगन्नाथ हुलजी, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, आर.एम. चौगुले, भागोजी पाटील, माजी जिपं सदस्या सरस्वती पाटील आदींसह बेळगाव शहर, तालुक्यातून पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: