बेळगाव जिल्ह्यातील विविध पक्ष आणि संघटनांच्या नेत्यांनी बेळगावात आज धर्मनिरपेक्ष जनता दलात (जेडीएस) राज्य उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. येत्या काही दिवसांत भाजप आणि काँग्रेसमधील गोंधळाला कंटाळलेले त्या पक्षांचे अनेक नेते जेडीएसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती माडलगी यांनी पत्रकारांना दिली.

बेळगावातील कन्नड साहित्य भवनात आज जेडीएसमध्ये काँग्रेस आणि रयत संघटनेच्या नेत्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी जेडीएस राज्य उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रकाश माळगी, आनंद माळगी आणि राज्य रयत संघटनेचे नेते शिवानंद मुगळीहाळ यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केला. त्यांना नेत्यांच्या हस्ते जेडीएसचा पक्ष ध्वज देऊन, पक्षाची शाल घालून पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांनी सांगितले की, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांत गोंधळाचे वातावरण आहे. त्याला कंटाळलेले त्या पक्षांचे अनेक नेते जेडीएसमध्ये प्रवेश करत आहेत. जेडीएसला राज्यात वाढता पाठिंबा मिळत आहे. कन्नड रक्षण वेदिकेनेही नुकतेच आम्हाला संपूर्ण राज्यात समर्थन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावेळी रायबाग मतदार संघातून निवडणूक लढवले प्रदीप माळगी, कुडचीतून लढलेले आनंद माळगी तसेच रयत संघटनेचे नेते शिवानंद मुगळीहाळ यांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापराव पाटील यांनी अलीकडेच आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जेडीएसला मोठे बळ मिळाले आहे. जेडीएसचे राज्य उपाध्यक्ष झालेल्या प्रतापराव पाटील यांनी उत्तर कर्नाटकात अनेक ठिकाणी जिल्हा दौरे करून जेडीएस मजबूत करण्यास प्रारंभ केला आहे. बेळगाव जिल्ह्यात जेडीएसला वाढते समर्थन मिळत आहे. रयत संघ आणि कृषक समाजाचे सिदगौडा मोदगी व अन्य नेत्यांनी जिल्ह्यातील चार मतदारसंघात त्यांच्या नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ती आम्ही पक्षाच्या नेत्यांच्या कानी घातली आहे असे त्यांनी सांगितले.
जेडीएसच्या पंचरत्न यात्रेला बेळगाव जिल्ह्यासह राज्यात चांगले समर्थन लाभत आहे असे सांगून या यात्रेत जेडीएस सत्तेवर येऊन एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाल्यास राबविण्यात येणार असलेल्या कल्याणकारी योजनांबाबत प्रचार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या युवतीला दोन लाख रुपये मंजूर करण्यात येतील. प्रत्येक ग्रापं स्तरावर एक कन्नड व एक इंग्रजी माध्यमाची हायटेक शाळा सुरु करून तेथे केजी ते पीयुसीपर्यंतचे मोफत शिक्षण देणे आदी योजना जेडीएस राबवणार आहे. त्याचा प्रचार यात्रेत करण्यात येत आहे. आगामी काळात बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस-भाजपचे अनेक नेते जेडीएसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शंकर माडलगी यांनी दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रयत संघातून जेडीएसमध्ये प्रवेश केलेले शिवानंद मुगळीहाळ यांनी सांगितले की, जेडीएस पक्षाच्या तत्व आणि सिद्धांतावर विश्वास ठेवून मी या पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाने संधी दिल्यास बेळगाव उत्तरमधून निवडणूक लढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेश कार्यक्रम आणि पत्रकार परिषदेला जेडीएसचे ज्येष्ठ नेते फैजुल्ला माडीवाले यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments