Belagavi

बेळगावात हुतात्मा हेमू कलानी यांची जन्मशताब्दी उत्साहात

Share

अत्यंत तरुण वयात देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे हुतात्मा हेमू कलानी यांची जन्मशताब्दी आज बेळगावात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पाटील गल्लीतील हेमू कलानी चौकात हेमू कलानी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
होय, भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी प्राणांची बाजी लावली. हुतात्मा हेमू कलानी हे त्यापैकीच एक. अगदी तरुण वयात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधातील आंदोलनात भाग घेऊन हौतात्म्य पत्करले. आज 23 मार्च, त्यांचा शंभरावा जन्मदिवस. यानिमित्त बेळगावातील पाटील गल्लीतील हेमू कलानी चौकात सिंधी समाजाच्या वतीने या थोर क्रांतिकारकाला नमन करण्यात आले. चौकातील स्मारकात हेमू कलानी यांच्या पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, हुतात्मा हेमू कलानी अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.

 

यावेळी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले की, हुतात्मा हेमू कलानी यांनी देशासाठी दिलेले बलिदान अमूल्य आहे. त्यांच्या नावाचा चौक बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात आहे हे आपले भाग्य आहे. या चौकाचा विकास करावा ही सिंधी समाजाची मागणी आहे. याआधी माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू मुतगेकर यांनी आपल्या कार्यकाळात या चौकाचा विकास घडवून आणला आहे. आणखी काही कामे करायची असतील ती करून चौक आणखी सुंदर बनविण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन आ. अनिल बेनके यांनी दिले.

यावेळी बोलताना माजी महापौर शिरता पाटील यांनी सांगितले की, हुतात्मा हेमू कलानी यांचे देशासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे. आज संपूर्ण सिंधी समाज त्यांना नमन करण्यासाठी येथे एकवटला आहे. अन्य समाजातील लोकांनीही त्यांचा आदर्श घेऊन आपापल्या समाजातील शहिदांचा गौरव केला पाहिजे. गेल्या पाच वर्षांत आम्ही महानगर पालिकेकडून या चौकाचा विकास आणि सुशोभीकरण केले आहे. आणखी काही नवीन कामे आ. बेनके पूर्ण करतील व्यक्त केली.

यावेळी बोलताना सिंधी समाजाचे नेते राजेश जमनानी यांनी सांगितले की, 23 मार्च 1923 रोजी जन्मलेल्या हेमू कलानी यांनी तरुण वयातच देशासाठी हौतात्म्य पत्करून स्वातंत्र्यलढ्यात देशभक्तीची मशाल पेटवली. त्यांचे ऋण फेडणे शक्यच नाही, तरीही अल्पसा प्रयत्न करून त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व सिंधी समाज येथे एकवटला आहे. हेमू कलानी चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, पूजन करून अभिवादन केले आहे. हेमू कलानी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही आज शहरात बाईक रॅली काढली असून, संध्याकाळी सात वाजता सिंधी सांस्कृतिक भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वानी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, हेमू कलानी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन कार्यक्रमानंतर सिंधी समाजातर्फे बेळगावात दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, सतीश गोरगौंडा, सिद्धार्थ भातकांडे, राम जमनानी, संतोष वाधवा, मनोज मुलानी, गणेश तोलानी, महेश गोदवानी, नरेश गोदवानी, हरिराम गोदवानी, अशोक रामचंदानी यांच्यासह सिंधी समाजाचे स्त्री-पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: