बेळगावात कांगली गल्लीत घराला आगीत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवानेच या घटनेत जीवितहानी टळली.
बेळगावच्या मध्यवर्ती भागातील कांगली गल्लीतील ठाकूर कुटुंबियांच्या जुन्या राहत्या घराला आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. या इमारतीत वरच्या मजल्यावर ठाकूर कुटुंबीय राहतात, तर खाली रस्त्याला लागून त्यांचा फोटो स्टुडिओ आणि भाड्याने दिलेली दोन दुकाने आहेत. त्यांनाही या आगीची मोठी झळ बसली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने ठाकूर कुटुंबीय लागलीच घराबाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाल्याने ठाकूर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले.

या आगीत घरातील प्रापंचिक साहित्य, कपडे, इलेक्ट्रिकल वस्तू व अन्य साहित्य जळून खाक झाले. देवघर आणि भिंतींनाही आगीची झळ बसली. एवढे नाही तर खिडक्या आणि आतील दरवाजेदेखील कोळसा होऊन गेले. उन्हाच्या तडाख्याने काही वेळातच आगीने संपूर्ण घराला विळखा घातला. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात उंचावरून दिसून येत होते. नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. दोन्ही दले तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, बेळगाव उत्तरेस आ. अनिल बेनके यांनी माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन ठाकूर कुटुंबियांना धीर दिला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सकाळी 11च्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी मास्टरप्लॅनमध्ये ठाकूर कुटुंबियांच्या घराचा मोठा भाग रस्ता रुंदीकरणात गेला आहे. आता या आगीमुळे त्यांचे किमान 10-15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सरकारकडून योग्य भरपाई मिळेलच, पण घर नव्याने बांधण्यासाठी एक रुपयाही न घेता महानगर पालिकेकडून परवाना मंजूर करण्यात येईल. त्यासाठी ठाकूर कुटुंबीयांनी अर्ज दिल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येईल. बेळगावात उन्हाळ्यामुळे यंदा आगीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः जुन्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन आ. बेनके यांनी केले. बाईट
यावेळी आगीच्या घटनेची माहिती देताना नागराजसिंह बालाजीसिंह ठाकूर यांनी सांगितले की, आज सकाळी 11च्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण घराला वेढले. त्यामुळे घरातील सगळे सांसारिक साहित्य पाहता-पाहता भस्मसात झाले आहे. फोटो स्टुडिओ आणि भाड्याने दिलेल्या दोन दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. या आगीमुळे आमचे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, आगीची घटना पाहण्यासाठी कांगली गल्लीतील आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमले होते. एकंदर आगीच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बेळगावकरांनी दक्षता घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


Recent Comments