Belagavi

अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २४ तास पाण्याचा अपव्यय

Share

बेळगावात एल अँड टी कंपनीच्या दुर्लक्षामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याची ओरड सुरु असतानाच अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २४ तास पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
होय, बेळगावात भर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असताना विनाकारण २४ तास पाणी वाया जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहरूनगर येथील एपीएमसी रोडवरील इंदिरा कॅन्टीन शेजारील तालुका पंचायतीच्या एका इमारतीला दिलेल्या नळजोडणीतून तोटीअभावी पाणी सतत वाहून जात आहे. याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून दुरुस्तीसाठी दुर्लक्ष करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना येथील व्यापारी परशराम पालकर यांनी सांगितले की, या ठिकाणच्या तालुका पंचायतीच्या नळाची तोटी समाजकंटकांनी चोरली असून उघड्या नळातून रोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्याबाबत तक्रार करूनही संबंधित अधिकारी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. शिवाय या परिसरात कचरा आणून टाकण्यात येतो. त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हेस्कॉमच्या वीज खांबांवर वेळी पसरल्या असून त्या वीजवाहक तारण स्पर्श करत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी वेळीच जागे होऊन येथील समस्या सोडवावी अशी मागणी त्यांनी केली.

एकंदर, शहरवासीयांना एकीकडे पाण्याची टंचाई जाणवत असताना केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मौल्यवान पाणी वाया जात आहे ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

Tags: