Belagavi

बेळगाव जिल्हा आरोग्य विभागाला राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार

Share

आरोग्यसेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याला राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बंगळूर येथे झालेल्या लक्ष्य कार्यक्रमाच्या मुख्य पुरस्कार समारंभात बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी यांना आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा, कर्नाटक सरकारचे आयुक्त रणदीप डी. यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील 7 सरकारी आरोग्य संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार तर 8 शासकीय आरोग्य संस्थांना राज्य पुरस्कार आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

अतिरिक्त जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस.एस.गडेद, जिल्हा माता व बाल आरोग्य अधिकारी डॉ. चेतन कंकणवाडी, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एम. सी.किवडसन्नावर, जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम अंमलबजावणी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, या कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी, डॉ. शिवलीला शिरोळ जिल्हा गुणवत्ता हमी अधिकारी, कुमारी इरम्मा गुणवत्ता हमी व्यवस्थापक आणि या कार्यात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल बोयर यांनी अभिनंदन केले.

रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, स्वच्छतेवर भर, चांगल्या प्रसूती कक्षाच्या देखभालीद्वारे माता आणि बालमृत्यू टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती वाढवणे हे लक्ष्य कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अथणी, चिक्कोडी, हुक्केरी, सौंदत्ती, बैलहोंगल, माता व बाल रुग्णालय गोकाक, आणि जिल्हा रुग्णालय बेळगाव या जिल्हा सार्वजनिक रुग्णालयांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला असून अथणी, चिक्कोडी, हुक्केरी, सौंदत्ती, बैलहोंगल, खानापूर, रामदुर्ग, माता व बाल रुग्णालय वंटमुरी यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मूल्यमापन पथक आणि केंद्रीय मूल्यमापन पथकाने 80 ते 100 हून अधिक प्रसूती रुग्णालयांचा प्रसूती आणि शस्त्रक्रिया कक्ष, औषधे आणि उपकरणांची उपलब्धता, मातांची काळजी आणि नोंदणी आणि मुले या अंगाने विचार केल्यानंतर या संस्थांची पुरस्कारासाठी निवड केली.

Tags: