Belagavi

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पाडव्यानिमित्त फुंकले प्रचाराचे रणशिंग

Share

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. हिंडलगा गणपती मंदीर आणि सुळेभावी महालक्ष्मी मंदिरात पूजन करून त्यांनी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.

बुधवारी सकाळी प्रारंभी हिंडलगा गणपती मंदिरात गेलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व पक्षाच्या नेत्यांनी विघ्नविनायकाची प्रार्थना केली. प्रचाराचे काम आणि निवडणूक सुरळीत पार पडावी आणि सर्वांचे भले व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
त्यानंतर सुळेभावी आदिशक्ती श्री महालक्ष्मी देवीच्या उपस्थितीत जाऊन विशेष पूजा केली. निवडणूक प्रचारासाठी खास डिझाईन केलेल्या प्रचार वाहनालाही नमन करण्यात आले आणि अधिकृतपणे लॉन्च करण्यात आले.

त्याच बरोबर प्रचार पत्रिकेचेही अनावरण करण्यात आले, ज्यात त्यांनी गेल्या ५ वर्षातील कामगिरी, जनतेने दिलेले सहकार्य, त्यांनी अनुभवलेले कष्ट, जनतेचे प्रेम व विश्वास यांचे थोडक्यात वर्णन करून त्यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे.


यावेळी प्रचारासाठीच्या खास वाहनातून बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, गेली पाच वर्षे मी बेळगाव ग्रामीण मतदार संघात कसल्याही प्रकारचा, भाषा, संस्कृती, जात-पात असा भेदभाव न करता सर्वेजन सुखिनो भवंतु या भावनेने काम केले आहे. केवळ मतदार संघातील जनतेचे भले व्हावे, त्यांना सुविधा मिळाव्यात हा हेतू ठेवून जनतेची प्रामाणिक सेवा केली आहे. आज प्रचाराच्या शुभारंभाला तुम्ही येथे मोठ्या उत्साहाने आला आहात. असाच आशीर्वाद येत्या निवडणुकीत देऊन मला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सी. सी. पाटील, युवराज कदम, सुरेश इटगी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, मनोहर बेळगावकर, रमाकांत पावशे, रघुनाथ खांडेकर, प्रवीण पाटील, जयवंत बाळेकुंद्री, महेश सुग्नेनवर, दत्ता बंडीगणी, शंकरगौडा पाटील, बसवराज म्यागोटी, बसनगौडा पाटील आदी उपस्थित होते.

Tags: