रमेश जारकीहोळी यांचे जवळचे मित्र आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवू इच्छिणारे नागेश मन्नोळकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी आणखी एक मोठा धक्का दिलाय. त्यांनी कुद्रेमनी गावात मतदारांना वाटण्यासाठी आणलेले टिफिन बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेनुसार छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच पसरलाय. अद्याप अधिसूचना जाहीर झाली नसली तरी इच्छुकांकडून चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मतदारांना मिक्सर, लंच टिफिन बॉक्स, ताटे, साड्या, कुर्ते आदी आमिषांचे वाटप जोरदार करण्यात येत आहे. विशेषतः ग्रामीण मतदार संघात याला अगदी ऊत आला आहे. याच मतदार संघातील कुद्रेमनी गावात मतदारांना वाटण्यासाठी आणलेले नागेश मन्नोळकर यांचे छायाचित्र असलेले 400 हून अधिक जेवणाचे डबे अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. मन्नोळकर यांच्या मालकीच्या स्मार्ट कॅशु एलएलपी काजू फॅक्टरीचे नावही त्या डब्यांच्या बॉक्सवर आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी मिळालेल्या निश्चित माहितीवरून ग्रामीण मतदार संघातील कुद्रेमनी गावात रविवारी रात्री अचानक छापा मारून मतदारांना वाटण्यासाठी आणलेले डबे आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरलेली वाहने जप्त केली. यासंदर्भात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच नागेश मन्नोळकर आणि अन्य दोघांविरुद्ध मतदारांसाठी भोजनावळ घटल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे तिकीट इच्छुक असलेले नागेश मन्नोळकर हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष असून, माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मानले जातात. या कारवाईने ग्रामीण मतदार संघात खळबळ माजली आहे.
Recent Comments