Belagavi

पर्यावरण रक्षणासाठी आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकची मोहीम

Share

पर्यावरण रक्षणाच्या हेतूने बेळगावातील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विध्यार्थ्यानी शहरात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना विविध मुद्द्यांवर दक्षता घेण्याचे आवाहन केले.

शहर परिसरात स्वच्छता राखणे, ट्रॅफिक सिग्नलवर वाहने बंद करणे दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे, कार चालविताना सीटबेल्ट घालणे, पेट्रोल-डिझेलचा अनावश्यक वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करणे आदी मुद्द्यांवर बेळगावातील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विध्यार्थ्यानी शहरात जनजागृती मोहीम राबवली. यावेळी चन्नम्मा चौकातील सिग्नलवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने जनजागृती करणाऱ्या मजकुराचे फलक हाती घेऊन जनजागृती करण्यात आली. वाहनचालकांशी थेट संपर्क साधत हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट बांधून कार चालवण्याबाबत आवाहन करण्यात आले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गिरीश पर्वतमठ यांनी सांगितले की, विविध सामाजिक प्रश्नांवर विध्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती करण्याची मोहीम राबवण्याचे आमच्या कॉलेजने ठरविले आहे. नुकतेच आम्ही कित्तूर येथील राणी चन्नम्मा यांच्या किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवली आहे. आता पर्यावरण संरक्षणासाठी जागृती मोहीम हाती घेतली आहे. वाहने चालविताना अनेकजण बेजबाबदार वर्तन करतात. मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. पाचशे रुपयांचे हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. हेल्मेटअभावी अपघात झाल्यावर जखमी झाल्यास किमान १-२ लाख रुपये उपचारांवर खर्च करावे लागतात. त्याशिवाय कुटुंबावरील आर्थिक बोजाही वाढतो. ट्रॅफिक सिग्नलवर वाहने सुरु ठेवल्याने इंधनाची विनाकारण नासाडी होते. त्याशिवाय पर्यावरणाला धोका पोहोचतो त्यामुळे अशा मुद्द्यांवर आम्ही जनजागृती करत आहोत असे प्राचार्य डॉ. गिरीश पर्वतमठ यांनी सांगितले.

आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकच्या विध्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

Tags: