काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी भारताचा खरा इतिहास लपवून बाबर, औरंगजेब आणि मोगलांचा खोटा इतिहास समोर आणला. तो बदलून खरा इतिहास लिहून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील भारत बनवण्याची गरज आहे असे ठाम प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वास सरमा यांनी केले.
बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून शहापूरातील शिवाजी उद्यान परिसरात उभारलेल्या शिवचरित्र प्रकल्पाचा भव्य, शानदार उदघाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडला. या प्रकल्पाचे उदघाटन करून बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वास सरमा पुढे म्हणाले, भारत हिंदू धर्माच्या संकल्पनेनुसारच पुढे जाईल. आम्हाला मदरशांची गरज नाही, शाळा-महाविद्यालयांची गरज आहे.

काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी देशाचा खरा इतिहास लपवून मोगलांचा, औरंगजेब, बाबराच्या खोटा इतिहास पुढे आणला. परंतु औरंगजेब कधीच संपूर्ण भारत जिंकू शकला नाही. पूर्वोत्तर भारतात, मध्य भारत आणि दक्षिण भारतात त्याला कधीच यश मिळाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सळो की पळो करून सोडले. त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज १०० पटींनी अधिक पराक्रमी होते. तत्कालीन आसाममधील महाराज स्वर्गदेव सुखदेवसिंह यांनी छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन मोगलांचा प्रभाव केला. इतकी ताकद शिवरायांच्या केवळ नावात होती. भारताचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, दुर्गादास राठोड, लचित अशा पराक्रमी राजा-महाराजांचा आहे. हा खरा इतिहास आजच्या पिढीपुढे, जगापुढे आणण्याची गरज आहे असे सरमा म्हणाले.
बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर होईल अशी कल्पना कोणी केली नव्हती. पण आज पंतप्रधान मोदींमुळे ते शक्य झाले. काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल आदी मंदिरांचा कॉरिडॉर त्यांनी उभारला. मंदिरे तोडण्याचे पण मोगलानी केले. पण मंदिरांच्या विकासाचे, उभारणीचे काम मोदी करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वतःची कोरोना लस बनवली. देशात विकासाचे नवे पर्व सुरु झाले. राममंदिराला आक्षेप घेत काँग्रेस देशाला दुर्बल बनवण्याचे काम करत आहे. बेळगावातील शिवचरित्र प्रकल्पाला काँग्रेस सरकारने निधी दिला नाही.

परंतु आ. अभय पाटील यांनी जिद्दीने हा प्रकल्प पूर्ण करून शिवभक्तांचे स्वप्न साकार केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असे सांगून काँग्रेस शिवाजी महाराजांच्या प्रकल्पाला विरोध करेल पण बाबरची चिंता करेल अशी टीका त्यांनी केली. बेळगावची भूमी पावन आहे. छत्रपती शिवरायांचे पवित्र चरण या भूमीला लागले. स्वामी विवेकानंदांनी येथे वास्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचा पदस्पर्श या भूमीला लागला आहे. एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी पवित्र भूमी बेळगावची आहे असे गौरवोद्गार काढून त्यामुळेच विधानसभेत बजेट मांडून झाल्यावर सगळी कामे सोडून तडक मी या पवित्र भूमीत होत असलेल्या शिवचरित्र लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिलो आहे असं सरमा यांनी सांगितले.
हिंदू सिंह म्हणून ओळखले जाणारे विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज शतकानुशतके तमाम हिंदूंचे प्रेरणास्थान आहेत व राहतील. विजापूरच्या आदिलशहाला अगदी बालवयात झुकून मुजरा करण्यास शिवरायांनी स्पष्ट नकार दिला होता. हाच स्वाभिमान बाळगून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुंता झाली असती. औरंगजेबासारख्या बलाढ्य मोगल सम्राटाला त्यांनी पाणी पाजले. त्यांचे शौर्य, स्वाभिमान, सुशासन सूर्य-चंद्र असेतोवर तळपत राहील. त्यांच्या प्रेरणेतून समर्थ भारत घडवू असे आवाहन आ. यत्नाळ यांनी केले.

प्रास्ताविक करताना आ. अभय पाटील म्हणाले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन अत्यंत स्फूर्तिदायी आहे. त्यांच्या जीवनातील निवडक प्रसंगांवर आधारित, नवीन पिढीला आदर्श ठरावा असा शिवचरित्र प्रकल्प साकारावा हे बेळगावकरांचे आणि माझे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याने समाधान वाटते. या प्रकल्पासाठी शिवचरित्राचे अभ्यासक अर्जुनराव गौंडाडकर, गजानन साठे, डॉ. विनोद गायकवाड, डॉ. सर्जू काटकर आदींची अभ्यास समिती नेमली होती. त्यांनी यासाठीच्या दौऱ्यात सहभागी होऊन, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. त्यांचे योगदान मोठे आहे असा गौरवपूर्ण उल्लेख आ. अभय पाटील यांनी केला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. सर्जू काटकर यांचेही भाषण झाले. प्रारंभी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वास सरमा व अन्य मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून शिवचरित्र प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनी स्वागत केले. व्यासपीठावर भाजपचे राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा, राज्य मराठा समाज विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. मारुतीराव मुळे, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक गिरीश धोंगडी, राजू भातकांडे, जयंत जाधव आदी उपस्थित होते. शिवचरित्र उदघाटन सोहळ्याला शहापूर, बेळगावसह परिसरातील हजारो शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात उपस्थित होते.


Recent Comments