बेळगावातील चन्नम्मानगर परिसरात उदभवलेली पाण्याची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी एल अँड टी कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
होय, एकीकडे उन्हाची काहिली सुरु असतानाच बेळगाव शहराला तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागासह विशेषतः उपनगरी भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र बनत चालली आहे. चन्नम्मा नगर परिसरातसुद्धा हीच परिस्थिती आहे. येथील अनेक ठिकाणच्या वसाहतींना 8 ते 10 दिवसांतून एकदा पाणी पुरविण्यात येत आहे. त्यामुळे रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आणि महिलांनी आज बेळगावातील खानापूर रस्त्यावरील एल अँड टी कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.
यासंदर्भात माहिती देताना चन्नम्मा नगरच्या रहिवासी स्मिता नेरुरकर यांनी सांगितले की, आमच्या परिसरात पाणी समस्या तीव्र बनली आहे. 4 ते 5 दिवसांऐवजी 8 ते 10 दिवसांतून एकदा पाणी पुरविणार असल्याचे व्हॉल्वमन सांगत आहेत. पहिल्या स्टेजपासून ते सेकंड स्टेज, श्रीराम कॉलनी, राघवेंद्र कॉलनी, पार्वतीनगर, वसंत विहार कॉलनी, कृष्णा कॉलनी आदी वसाहतीत पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. आम्ही सगळे महापालिकेला नियमित वेळेवर कर भरतो. पण सुविधा, पाणी देताना आमच्यावर अन्याय केला जातोय. पाणी पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले की, तब्बल दहा दिवसांतून एकदा पाणी पुरविण्यात येत असल्याने चन्नम्मा नगर भागातील नागरिकांचे खास करून महिलांना मोठे हाल भोगावे लागत आहेत. त्यामुळे आमची सगळी कामे सोडून आम्ही निवेदन देण्यास आलोय. संबंधित अधिकाऱ्यांनी आमचे निवेदन स्वीकारून तातडीने आमची पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी त्यांनी केली.
राघोचे यांनी पाइपलाईनला अनेक ठिकाणी गळत्या लागलेल्या असून त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. किमान ५ किमीची नवी पाईपलाईन घातल्यास ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. एल अँड टी कंपनीने ते काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, रहिवासी कार्यालयात आल्यावर अधिकारी उपस्थित नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. नंतर एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Recent Comments