तब्बल तेरा वर्षांनी परंपरेप्रमाणे कंग्राळी बुद्रुक गावामध्ये घुग्गुळ कार्यक्रम भक्तिभावाने उत्साहात संपन्न झाला. चव्हाण, पाटील व कोनेरी-जाधव या घराण्याच्या व्यक्तींनी घुग्गुळ कार्यक्रमात पारंपरिक विधी पार पाडले.
प्रारंभी लक्ष्मी मंदिर येथे वीरभद्रेश्वर देवाची पूजा करून या घुग्गुळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रत्येक घरामधून घुग्गुळ घेऊन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात काढलेली घुग्गुळ मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मंदिराशेजारील जागेत घुग्गुळचे पारंपरिक विधी करण्यात आले. यावेळी पुरवंतांनी विविध पारंपरिक विधी, लक्ष्यवेधी नृत्य सादर केले. त्यानंतर कलमेश्वर मंदिराकडे जाऊन या घुग्गुळ कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी झालेला हा घुगुळचा कार्यक्रम डोळ्याचे पारणे फेडणारा होता.

यावेळी माहिती देताना चव्हाण घराण्याचे ज्येष्ठ नागरिक चव्हाण यांनी सांगितले की, तेरा वर्षानंतर यंदा गावात घुग्गुळ कार्यक्रम परंपरेने साजरा करण्यात आला आहे. वीरभद्रेश्वराच्या ४ मूर्ती आणून गावातील प्रमुख चौकात उतरून तासभर विविध विधी करण्यात आले. चव्हाण परिवारातील सदस्य, गावकरी, पुजारी यात सहभागी झाले होते.
कोनेरी-जाधव घराण्याचे शंकर कोनेरी-जाधव यांनी सांगितले की, हा घुग्गुळ कार्यक्रम कोनेरी-जाधव, चव्हाण आणि पाटील घराण्याचा असला तरी सर्व गावकऱ्यांनी यात भक्तिभावाने सहभाग घेतल्याने हा संपूर्ण गावचा उत्सव ठरला आहे. यासाठी महिनाभर आधीपासून आम्ही परिश्रम घेत होतो. यामुळे गावात एकी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांनी सांगितले की, धार्मिक परंपरेनुसार १३ वर्षांनी गावात हा घुग्गुळ कार्यक्रम पार पडला आहे. कोनेरी-जाधव, चव्हाण आणि पाटील घराणे तसेच देवस्थान पुजारी आणि पंचांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पडला, त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत असे त्यांनी सांगितले.
2010 मध्ये झालेली ही कंग्राळी बुद्रुक येथील ही घुग्गुळ यात्रा तब्बल 13 वर्षांनी पार पडली असल्याने
कंग्राळी बुद्रुक येथील माहेरवाशी, सुहासिनी , तसेच नातेवाईकांनी या घुगुळ कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


Recent Comments