अनगोळ परिसराला पुरेसा पाणी पुरवठा केला जात नसल्याच्या निषेधार्थ स्थानिक महिला आणि रहिवाशांनी रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन छेडले. यावेळी महापालिका आणि एल अँड टी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पाणी पुरवठ्याची मागणी लावून धरण्यात आली. त्याचप्रमाणे अनगोळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली.
वाढत्या उन्हाळ्याबरोबरच बेळगाव शहरात पाणीसमस्या तीव्र बनत चालली आहे. दक्षिण मतदार संघात येणाऱ्या अनगोळ परिसराला गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून पाण्याचा पुरेसा पुरवठा केला जात नसल्याने रहिवाशांसाठी विशेषतः महिलांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनगोळमधील धर्मवीर संभाजी चौकात एकत्र जमून महिला व रहिवाशांनी निदर्शने केली. रिकाम्या घागरी समोर ठेवून बेळगाव महापालिका आणि एल अँड टी कंपनीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
यासंदर्भात बोलताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात पाणी समस्या तीव्र झाली आहे. येथे प्रामुख्याने कामगार वर्ग राहतो. त्यांना कामावर जायचे का पाण्यासाठी घरी बसून रहायचे असा प्रश्न पडला आहे. विशेषतः महिलांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही आठवड्यापूर्वी महापौर आणि पालिका यक्ताना निवेदन देऊन लक्ष वेधले होते.
मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याने आम्ही पालिकेवर मोर्चा काढायचे ठरवले होते. मात्र एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला भेटून, मोर्चा काढू नका, आम्हीच तुम्हाला भेटून निवेदन स्वीकारतो असे सांगितले. त्यामुळे आज येथे निदर्शने करून त्यांना निवेदन दिले आहे. हा भाग 24X7 पाणी पुरवठ्याच्या झोनमध्ये येत असूनही बेकायदा पाणीपुरवठा बंद केला आहे. या भागात पाणी साठवण्यासाठी टाकी आदींची सोय नाही. त्यामुळे नागरिकांनाही पै कसे साठवून ठेवायचे हा प्रश्न पडला आहे.
येथील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन महापौर आणि आयुक्तांनी याला जबाबदार असणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे अनगोळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नुकतेच एका पाच वर्षांच्या मुलावर ४-५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे पालिकेने त्वरित भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी विनायक गुंजटकर यांनी केली.
नूतन ताशिलदार या स्थानिक महिलेने सांगितले की, अनगोळमधील राजहंस गल्ली व परिसरात एक दिवसाआड अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ते पुरेसे ठरत नाही. घरगुती वापरासाठी पाणीच मिळत नाही. या ठिकाणी विहीर, कूपनलिका अशी पाण्याची पर्यायी सोय नसल्याने आमच्या त्रासात भर पडत आहे. त्यामुळे येथील मनपा दवाखान्यासमोर पालिकेने कूपनलिका खोदून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी त्यांनी केली.
एकंदर, उन्हाच्या वाढत्या झळांबरोबरच बेळगाव शहर व उपनगरांत पाण्याची समस्या तीव्र बनत चालली आहे. त्यामुळेच नागरिकांचा रोष असा प्रकट होत आहे. निदान आतातरी महापालिकेने जागे होऊन पाणी समस्या सोडवावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. ती पालिका कधी पूर्ण करणार हे पाहावे लागेल.
Recent Comments