Belagavi

शिवचरित्र प्रकल्पाचे गुरूवारी स्मृती इराणींच्या हस्ते होणार लोकार्पण

Share

बेळगाव दक्षिण मतदार संघातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवचरित्र शिवसृष्टीच्या उदघाटनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या गुरुवारी दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते ‘शिवचरित्र’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन आ. अभय पाटील यांनी सांगितले की, हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील निवडक प्रसंगावर आधारित शिवचरित्र प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. ध्वनी-प्रकाश योजनेवर आधारित छत्रपती शिवरायांच्या जीवनाबद्दल येथे माहिती देण्यात येणार आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत शिवचरित्रला भेट देता येईल. सायंकाळी ६.३० नंतर मराठी व कन्नड भाषेत प्रत्येकी ४० मिनिटांच्या कार्यक्रमात ब्लु टूथ आणि वॉकमनच्या साह्याने शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांची माहिती देण्यात येईल. याठिकाणी एकावेळी ४०० लोक एकत्र बसून या कार्यक्रमाचा आनंद लुटू शकतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय देशात सर्वप्रथम पाण्याच्या कारंजावर आधारित शिवचरित्रातील प्रसंग पाहण्याची सोय येथे उपलब्ध केली आहे. शिवचरित्राच्या उदघाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ, मराठा प्राधिकरणाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

गोवावेस बसवेश्वर चौकातील संत बसवेश्वर मूर्ती ३०-४० वर्षे जुनी असून ती खराब झाली आहे. त्यामुळे तेथे संत बसवेश्वरांच्या भव्य पुतळ्याची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी वीरशैव महासभेने पुढाकार घेऊन महाराष्ट्रात पुतळा निर्मितीची ऑर्डर दिली आहे. यातून संत बसवेश्वरांचा १५ फुटी भव्य पुतळा साकारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी वीरशैव महासभेच्या माध्यमातून माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, भाजप राज्यप्रवक्ता एम. बी. जिरली यांनी पुढाकार घेतला आहे. पुतळ्याची रक्कम महापालिका आणि आमदार निधीतून देण्यात येणार आहे. याठिकाणी असलेल्या सुमारे १ एकर जागेत बसवेश्वरांच्या संकल्पनेतील अनुभव मंडपाच्या प्रतिकृतीचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ४ ते ५ कोटीपर्यंत खर्च येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी यासाठी विषेश निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री बोम्मई यांच्याहस्ते या प्रकल्पाची कोनशिला बसविण्यात येणार असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

अनुहव मंडप प्रकल्पासाठी बॉलिवूडचे प्रख्यात नेपथ्यकार नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला मी व प्रभाकर कोरे यांनी भेट देऊन चर्चा केली आहे. बेंगळूरमधील वीरशैव महासभेच्या आवारातील प्रकल्पाप्रमाणे याची उभारणी केली जाईल. त्याचप्रमाणे अनगोळ येथील आंबेडकर तलावाच्या काठावर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. अनगोळमधील धर्मवीर संभाजी चौकात २२ मार्चला धर्मवीर संभाजी महाराजांचा भव्य पुतळाही उभारण्यात येणार असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

यावेळी उत्तरचे आ. अनिल बेनके, नगरसेवक गिरीश धोंगडी आदी उपस्थित होते.

Tags: