होळी पौर्णिमेनंतर , पाचव्या दिवशी येणार रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी .. बेळगाव दक्षिण भागासह अन्यत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात रंगपंचमी साजरी करण्यात आली .
बेळगाव दक्षिण मधील शहापूर आणि वडगावसहित अन्य भागात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली . अबाल वृद्ध रंगाने माखून गेले होते . एकमेकांना रंग लावत , गाण्याच्या तालावर बेफाम होऊन नृत्य करीत होते .

रंगोत्सवाचा जल्लोष प्रत्येक ठिकाणी दिसून येत होता . . सकाळपासूनच अबालवृद्ध , महिला , तरुणी रंगपंचमी खेळण्यात मग्न होत्या . चेहऱ्याला सिल्वर रंग फासून , गोणपाटाची वेशभूषा करून , नाचत गात लहान मुले आणि तरुणाचा गट सर्वाना रंग लावत होता .
यात तरुणी आणि महिला देखील मागे नव्हत्या . वर्षातून एकदा साजरा केल्या जाणाऱ्या या रंगाच्या सणाचा त्या पुरेपूर आनंद लुटत होत्या .
सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डीजेच्या तालावर , पाण्याचे फवारे , रंगांची उधळण करीत गल्लोगल्ली बेधुंद होऊन सर्व जण रंगपंचमीचा आनंद लुटत होते .
याशिवाय बेळगाव शहरातील शहापूर भागातील नार्वेकर गल्ली, बसवण गल्ली, नवी गल्ली , सराफ गल्ली , गाडेमार्ग, बिसाचु गल्ली सहित अन्य ठिकाणी , दरवर्षीप्रमाणे , सर्वांच्या सहकार्याने रंगपंचंमी साजरी केली जात असल्याचे इथले रहिवासी , रमेश डवरी यांनी सांगितले .

रंगपंचमी साजरी करणाऱ्या तरुणींपैकी एकीने सांगितले कि , आमच्या भागात होळीपासून पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते . आम्ही सर्व या दिवसाची वाट पाहत असतो . अगदी लहानापासून मोठ्यांपर्यत आम्ही रंगपंचमी साजरी करतो . यावेळी सर्वानी होळीच्या शुभेच्छा दिल्या
दरम्यान, रंगपंचमीनिमित्त शहापूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त सुरु होती .


Recent Comments