Mandya

काँग्रेस सरकारने देशातील गरीब कुटुंबाना धुळीस मिळवले : मोदींचा घणाघात

Share

यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने देशातील गरीब कुटुंबाना धुळीस मिळवण्यात कसर सोडली नाही. भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर गरिबांची इमानदारीने सेवा करण्याचे व्रत स्वीकारले आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहते आहे. मात्र देशातील लाखो-करोडो जनता, माता-भगिनी मोदींचे अभेद्य सुरक्षा कवच आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंड्या येथे आज 8479 कोटी रुपये खर्चून बांधलेला बेंगळुर-म्हैसूर द्रुतगती मार्ग राष्ट्राला समर्पित केला. दरम्यान, म्हैसूर-कुशलनगर 4 पदरी महामार्गाच्या कामाची 4128 कोटी रुपये खर्चाची आणि बंगळुरू-म्हैसूर विभागातील राष्ट्रीय महामार्ग 275 वर 2 सहा पदरी महामार्ग प्रकल्पांची कोनशिला बसवली.
त्यानंतर हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाच्या जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज तुम्ही प्रचंड उत्साहाने, प्रेमाने माझे येथे स्वागत केले आहे. या प्रेमाची मी विकासाच्या रूपातून तुम्हाला परतफेड करणार आहे.

कृष्णराज वडेयर आणि सर एम. विश्वेश्वरय्या हे दोन महापुरुष मंड्याच्या भूमीने भारतमातेला दिले त्यांच्या प्रेरणेतून आम्ही विकासाची कामे करत आहोत. भारतमाला, सागरमाला यासारख्या प्रकल्पातून देश, कर्नाटक बदलतोय. कोरोनात सगळे जग हैराण झाले असताना भारतात, कर्नाटकात मात्र परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. जनतेला मूलभूत सुविधा देण्यावर आम्ही भर दिला. यंदाही यासाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली आहे. रामनगर, मंड्यावरून जाणाऱ्या बेंगळूर-म्हैसूर द्रुतगती मार्गामुळे प्रवासाची वेळ निम्म्यावर आली आहे. त्याशिवाय येथील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळेल असे मोदी म्हणाले.

यापूर्वी काँग्रेस सरकारने गरिबांना चुकीस मिळवण्यात कोणतीही कसर सोडली नाही असा आरोप करून मोदी म्हणाले, काँग्रेसने देशातील गरिबांचे हजारो, लाखो कोटी रुपये लुटले. गरिबांचे दुःख, कष्ट त्यांना माहित नव्हते. २०१४मध्ये तुम्ही मला मते देऊन तुमची सेवा करण्याची संधी दिल्यापासून भाजप सरकार गरिबांप्रती संवेदनशीलतेने काम करत आहे. काँग्रेसच्या काळात गरिबांना सुविधा मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागत. पण आम्ही गरिबांना पक्की घरे, राशन, उज्ज्वला योजनेतून गॅस, नळजोडणी, चांगले रस्ते, इस्पितळे आदी सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले. मंड्या जिल्ह्यात अनेक दशके पाणी योजना ठप्प होत्या. भाजप सरकारने त्या सुरु करण्यावर भर दिला. यंदाही अर्थसंकल्पात अपर भद्रा प्रकल्पासाठी ५३०० कोटींचे अनुदान दिले.

राज्यातील शेतकऱ्यांना १२ हजार कोटींहून अधिक मदत डीबीटी तत्वावर थेट बँक खात्याला जमा केले. त्याचा मंड्या जिल्ह्यातील ३.५ लाख शेतकऱ्यांनाही फायदा झालाय. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ६ हजार रुपये मदत केली, त्यात कर्नाटक सरकारने ४ हजार घालून एकूण दहा हजार रुपये मदत केली. डबल इंजिन सरकारचा असा डबल फायदा कर्नाटकातील शेतकरी, जनतेला झाला आहे असे मोदी म्हणाले. काँग्रेस मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पहात आहेत. पण त्यांना हे माहित नाही की, देशातील जनता, माता-भगिनी मोदींचे अभेद्य सुरक्षा कवच आहे असे मोदी म्हणाले.
प्रारंभी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत करून महामार्ग प्रकल्पांच्या कामाची माहिती दिली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजनांची माहिती दिली.

खासदार प्रतापसिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या हिंदी भाषणाचा कन्नडमध्ये अनुवाद केला. दरम्यान, इतके दिवस भाजपमध्ये येणार म्हणून चर्चेत असलेल्या काँग्रेस समर्थित अपक्ष खासदार अभिनेत्री सुमलता अंबरीश यांनी मोदींना भेटवस्तू देऊन स्वागत करून भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चाना पूर्णविराम दिला. फ्लो
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार प्रतापसिंह, सुमलता अंबरीश आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: