Dharwad

भारतीय लोकशाहीवर प्रश्न करणाऱ्यांपासून सतर्क रहा : मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Share

संत बसवेश्वरांनी जगात सर्वप्रथम लोकशाहीची संकल्पना मांडली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा लंडनमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे. त्या लंडनमध्ये जाऊन काही लोक भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्यापासून सतर्क रहा असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज धारवाडजवळ आयआयटीचे उदघाटन, रेल्वेमार्ग विद्युतीकरण आणि दुपरीकरण आदी विकासकामांची कोनशिला उभारण्यात आली. त्याचप्रमाणे हुबळी सिद्धारूढ रेल्वेस्थानकावरील जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मचे उदघाटन त्यांनी केले. त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. कन्नडमधून भाषणाची सुरवात केल्यानंतर बोलताना मोदी म्हणाले, बसवेश्वरांनी जगात अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यामुळे भारत लोकशाहीची माता आहे.

काही वर्षांपूर्वी संत बसवेश्वरांच्या लंडनमधील पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. मात्र आज त्याच लंडनमध्ये जाऊन काही लोक भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्यापासून सतर्क रहा असे मोदी यांनी सांगितले. कर्नाटकातील जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. त्याची परतफेड कर्नाटकाच्या विकासातून करणार आहे. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास व्हावा, कर्नाटकातील लोकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, तरुणांचे भविष्य उज्ज्वल झाले पाहिजे ही भाजपच्या डबल इंजिन सरकारची इच्छा आहे.

धारवाड हे केवळ प्रवेशद्वार नसून कर्नाटकचे प्रतिबिंब नसून कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी आहे. धारवाड हे साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. द. रा. बेंद्रे, पंडित भीमसेन जोशी, गंगुबाई हणगल, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासह अनेक रत्ने धारवाडने दिली आहेत. मंड्या येथे बंगळुरू म्हैसूर एक्सप्रेसवेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला मिळाले. अलीकडे बेळगावात अनेक विकासकामांची उद्घाटने झाली आहेत. शिमोगा येथे कुवेम्पू विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे कर्नाटकात पर्यटन, औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला वेग येईल असे मोदी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचेही भाषण झाले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री बोम्मई यांनी मोदींना वेलचीचा हार तर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी वेलचीपासून बनवलेला फेटा अर्पण केला. मंत्री सोमण्णा, सी. सी. पाटील यांनी सिद्धारूढ स्वामीजींची मूर्ती तर प्रल्हाद जोशी यांनी प्रसिद्ध धारवाडी पेढे भेट दिले. आमदार अरविंद बेल्लद, अमृत देसाई यांनी कलघटगीच्या प्रसिद्ध लाकडी पाळणा मोदींना भेट दिला.

Tags: