कायद्याने अधिकार नसताना महापालिकेची बैठक आयुक्त कसे बोलावू शकतात? असा सवाल करून चुकीचे पायंडे पाडले जात असल्याबद्दल माजी महापौर व माजी आमदार रमेश कुडची यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बेळगावात पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश कुडची यांनी सध्या बेळगाव महापालिकेत कायद्याचे उल्लंघन करून सुरु असलेल्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्नाटक नगरपालिका कायद्यानुसार स्थानिक स्वराज संस्थेत अध्यक्ष वा महापौर यांना निर्णयाचे सर्वाधिकार असतात. यात बैठक बोलावण्यापासून, सदस्याला अपात्र ठरवणे, एखादा ठराव फेटाळणे आदी अधिकारांचा समावेश आहे. असे असताना, बेळगाव महापौरांची निवड होऊन देखील पालिकेची अर्थसंकल्पीय बैठक आयुक्त कसे काय बोलावू शकतात असा सवाल त्यांनी केला. आयुक्तांना अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार आहे. मात्र तो कर व अर्थ स्थायी समिती अध्यक्ष किंवा महापौरांना सादर केला पाहिजे. सभागृहाची अर्थसंकल्पीय बैठक बोलावून अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकारी आयुक्तांना नाही. महापौर कोणत्याही पक्षाचे असोत, सभागृहात ते सर्वोच्च असतात. त्यांच्या अनुमतीशिवाय अधिकाऱ्यांना सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाहीत.
यदाकदाचित सभागृहाने कायद्याच्या विरोधात एखादा ठराव केला तर आयुक्तांना तो अमलात आणता येत असा शेरा मारून सरकारला पाठविता येतो. पण त्या शेऱ्यासह त्यांनी तो ठराव महापौरांसमोर सादर केला पाहिजे. अशा अनेक तरतुदी कर्नाटक पालिका कायद्याच्या कलम 166 ते 172 दरम्यान नोंदविल्या आहेत. त्याचा अभ्यास आयुक्तांनी आणि संबंधितांनी केला पाहिजे असे रमेश कुडची यांनी सांगितले.
बेळगाव महापालिकेवर 3-3 वेळा निवडून आलेले काही नगरसेवक आहेत. 2 आमदार आहेत. तरीही चुकीचे पायंडे पाडले जात आहेत याकडे लक्ष वेधून रमेश कुडची म्हणाले, महापौर-उपमहापौर निवडीच्या 15 दिवसांत सर्व स्थायी समित्यांची रचना, त्यांच्या अध्यक्षांची निवड झाली पाहिजे असा नियम आहे. 1994मध्ये बेळगाव महापालिका अस्तित्वात आल्यापासून या नियमाचे पालन केले जाते. मात्र यंदा त्याला हरताळ फासण्यात आला आहे. पत्रकारांना बैठकीचे वार्तांकन करण्यास सभागृहात प्रवेश नाकारण्याचा आयुक्तांना अधिकार नाही. आपल्या 20 वर्षांच्या पालिकेतील कारकिर्दीत असा प्रकार झाला नव्हता. उलट मनपा बैठकीसह लाईव्ह (थेट) प्रसारण करण्यात आले होते. मात्र सध्याचे आयुक्त अधिकार नसतानाही पत्रकारांना बैठकीस मज्जाव करतात याबाबत कुडची यांनी नाराजी व्यक्त केली.
एकंदर, बेळगाव महापालिकेत आपल्या 20 वर्षांच्या पालिकेतील कारकिर्दीत घडले नव्हते असे बेकायदा प्रकार सद्या पालिकेत सुरू असल्यावरून माजी महापौर रमेश कुडची यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Recent Comments