Belagavi

‘गुलमोहर बाग’तर्फे महिला चित्रकारांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन

Share

बेळगावातील ‘गुलमोहर बाग’ या चित्रकारांच्या संस्थेतर्फे महिला चित्रकारांनी रेखाटलेल्या सुंदर, मनमोहक कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभतो आहे.

बेळगावातील स्थानिक चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बेळगावकरांच्या चित्रकलेतील ओढा वाढावा या हेतून स्थापन करण्यात आलेल्या गुलमोहर बाग संस्थेतर्फे या अनुषंगाने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आता जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेच्या महिला चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. टिळकवाडीतील हेरवाडकर शाळेजवळील वरेरकर नाट्यसंघाच्या कलामहर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत भरलेल्या या प्रदर्शनाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी गोगटे व स्नेहल पागे यांच्याहस्ते करण्यात आले.

या चित्र प्रदर्शनात गुलमोहर बागच्या 24 महिला चित्रकारांनी आपापल्या भावविश्वातून रेखाटलेल्या 24 सुंदर व मनमोहक चित्रकृतींची मांडणी करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 8 या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यास खुले असून त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

दरम्यान, प्रदर्शनाबद्दल ‘आपली मराठी’ला माहिती देताना गुलमोहर बागच्या सहसचिव प्रीती पावटे यांनी सांगितले की, बेळगावात अनेक प्रतिभावंत चित्रकार, कलाकार आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन बेळगावकर रसिकांचा कलेतील रस वाढविण्याच्या हेतूने गुलमोहर बागची स्थापना केली आहे. संस्थेतर्फे यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जागतिक महिला दिनानिमित्त महिला चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यातील अनेकजण आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आहेत. या चित्रकारांनी आपापल्या संकलनेतून, अनुभवातून साकारलेल्या सुंदर चित्रकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. त्याशिवाय चित्रकृतींच्या डेमोचेही आयोजन केले आहे. रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, प्रदर्शनात उद्या स्मिता नाडकर्णी यांचे गंजफी आर्टचे प्रात्यक्षिक आयोजिण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Tags: