काँग्रेसच्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांची बिले देण्यास ३ ते ६ महिन्यांचा विलंब होई, आम्ही आल्यावर हे चित्र बदलून दूध उत्पादकांना तातडीने बिले मिळण्याची सोय केली. सहकारी दूध उत्पादक संघांचे कर्ज माफ करून त्यांना बळकट केले असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
हावेरी येथे हावेरी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले, हावेरी सहकारी दूध संघाचे स्वतःचे प्रक्रिया आणि पॅकिंग युनिटचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागाने हा प्रकल्प पूर्ण करता आला असता, मात्र त्याचा पुरेपूर फायदा बळीराजाला व्हावा या हेतूने सहकारी संघाच्या माध्यमातून भाजप सरकारने हा प्रकल्प साकारला आहे. सरकारने दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशात आज गुजरातनंतर दुग्धोत्पादनात कर्नाटकाचा नंबर लागतो. नंदिनी हा कर्नाटकाचा ब्रँड राज्याची कामधेनू बनली आहे. एकेकाळी राज्यातील विशेषतः उत्तर कर्नाटकातील सहकारी दूध उत्पादक संघ हलाखीच्या स्थितीत होते. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना आम्ही एनडीडीबीकडे पाठपुरावा करून या संघांचे कर्ज माफ केले. तेंव्हापासून हे संघ मजबूत झाल्याचे बोम्मई म्हणाले.
मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले, हावेरी दूध उत्पादक संघाला मेगा डेअरी स्थापनेसाठी १०० कोटी रुपये अनुदानाची घोषणा करून त्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. येथे अत्युत्तम तंत्रज्ञान, परदेशी मशिन्सच्या साह्याने ६ महिने दूध टिकेल असे टेट्रा पॅक युनिट उभारण्यात आले आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ पॅकिंगला वेळ कमी लागतो, गळती, नुकसान टाळता येते आणि पैसेही अधिक मिळतात. दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. हावेरी, धारवाड आणि कारवार जिल्ह्यातही दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे असे त्यांनी सांगितले.
सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर म्हणाले, मुख्यमंत्री बोम्मई यांनी शब्द दिल्याप्रमाणे हावेरी जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला अनुदान देऊन मजबूत केले आहे. आता दूध उत्पादकांची सहकारी बँक सुरु करण्यासही त्यांनी मंजुरी दिली आहे. त्याचा ९ लाख दूध उत्पादक महिलांना लाभ होणार आहे. ३३ लाख शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यानी घेतलेला हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण, कामगार मंत्री शिवराम हेब्बार, आ. नेहरू ओलेकर, खा. शिवकुमार उदासी आदी उपस्थित होते.


Recent Comments