त्रिपुरा आणि नागालॅंडमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगावात आज विजयोत्सव साजरा करण्यात आला.
त्रिपुरा आणि नागालॅंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले असून, भाजप नेतृत्वाखालील सरकार आज स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या सोहळ्याला उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा चौकात जमून विजयोत्सव साजरा केला. भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकाला मिठाई भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी पंतप्रधान मोदी, भाजपच्या विजयाच्या आणि भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, त्रिपुरा, नागालँड या पूर्वोत्तर राज्यात राजकीय व सामाजिक स्थैर्य येण्यासाठी भाजपने गेली दहा वर्षे लक्ष केंद्रित केले होते. त्याला आज यश मिळाल्याचं दिसते. पंतप्रधान मोदींमुळे आज भारताचा डंका जगात वाजताना दिसतोय. मोदी यांच्या नेतृत्वाला आणि कर्तृत्वाला देशातील जनतेने समर्थन दिले आहे. त्रिपुरा आणि नागालॅंडमधील विजयावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता कर्नाटकातही येत्या विधानसभा निवडणुकीत मोदींच्या करिष्म्यामुळे भाजप पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील म्हणाले, मोदींच्या कार्यपद्धतीवर देशातील जनतेचा विश्वास आहे हे भाजपच्या त्रिपुरा आणि नागालॅंडमधील विजयावरून दिसून आले आहे. कर्नाटक निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप 150 जागांचे उद्दिष्ट गाठून विजय पताका फडकावेल असा दावा त्यांनी केला.
या विजयोत्सवात विजय हिरेमठ, शरद पाटील, सदानंद गुंटपन्नावर, शिल्पा केकरे, सविता आदी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.


Recent Comments