राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण रविवार दिनांक 19 मार्च रोजी करण्याचा निर्णय मराठा मंदिर येथे आयोजिण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. राजकीय फायद्यासाठी शिवरायांच्या नावाचा गैरवापर न करण्याची एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीत बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी ग्रामीण आमदारांच्या दिखाऊ शिवप्रेमावर ताशेरे ओढत, ज्यांना स्वतःच्या निवासस्थानाच्या परिसरातील शिवमूर्तीसंदर्भात निर्णय घेता आला नाही, त्या राजहंसगडावरील शिवमूर्तीसंदर्भात काय बोलणार? असा सवाल उपस्थित केला. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी केलेला दिखावा आणि यामुळे झालेला शिवरायांचा अवमान यासाठी शुद्धीकरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने मराठी जनतेने सहभागी होऊन मराठी माणसाची ताकद आणि एकजूट राष्ट्रीय पक्षांना दाखवावी, असे आवाहन केले.

तसेच भगव्या झेंड्यासहित राजहंसगडावर उपस्थित राहून महाराष्ट्रातील नेत्यांना आपली ताकद दाखवावी, असे आवाहन मनोहर किणेकर यांनी केले. राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे कामकाज हे जनतेच्याच पैशातून झाले असून दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून स्वतःच हे काम केल्याचा कांगावा करण्यात येत आहे. शिवाय या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नेत्यांनी दर्शविलेली उपस्थिती ही निषेधार्थ आहे. आगामी
काळात शिष्टाचार म्हणून याठिकाणी भविष्यात महाराष्ट्रातील जे नेते येतात, त्यांना याच भगव्या झेंड्यांच्या ऐवजी काळे झेंडे दाखविण्याची तयारी आणि त्यांना रोखण्याचा अधिकार सीमा भागातील मराठी जनतेला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर म्हणाले, राजहंसगड येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे राष्ट्रीय पक्षांनी दोनदा अनावरण केल्याने अवमान झालेल्या शिवमूर्तीचा राज्याभिषेक सोहळ्या प्रमाणे 19 मार्च रोजी शुध्दीकरण करण्यात यावे. दुग्धाभिषेक आणि पाद्यपूजन देखील करण्यात यावे. यावेळी गेल्या 8 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिवसृष्टीसंदर्भातही त्यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसृष्टीमध्ये कोंडून ठेवण्यात आलेल्या शिवरायांच्या मूर्तीचे देखील शुद्धीकरण करण्याचा इशारा त्यांनी दिला.
राजहंसगडावर 19 मार्च रोजी आयोजिलेल्या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी व्हावे आणि हा सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा करावा, यासाठी जनजागृती करणे आवश्यक असून एकसंधपणे जनजागृतीकरून जनतेचा पाठिंबा मिळवूया, असे ते म्हणाले. 19 मार्च रोजी राजहंस गडावर होणाऱ्या राज्याभिषेक आणि शिवरायांच्या मूर्तीच्या शुद्धीकरण सोहळ्यासाठी महाभोजन बनविणे आणि वाटपाची जबाबदारी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीसह आजूबाजूच्या खेडेगावातील समितीच्या घटकांनी घेतली आहे असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, एड. राजाभाऊ पाटील, बी वाय येतोजी, एम. जी. पाटील आदींसह समिती नेते, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments