Belagavi

बेळगावसह राज्यभरात बारावी परीक्षेला झाली सुरवात

Share

विध्यार्थी जीवनातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या बारावी परीक्षेला राज्यभरात आज सुरवात झाली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 42 केंद्रांवर एकूण 25,390 विध्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आज पहिल्या दिवशी भाषा विषयाचा पेपर पार पडला.

विध्यार्थी जीवनातील दहावीनंतर आणखी एक महत्वाचा टप्पा असलेल्या बारावी परीक्षेला राज्यभरात आज सुरवात झाली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातही बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. पदवीपूर्व शिक्षण खात्याने या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्रकारची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून परीक्षार्थी विध्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. 9 ते 25 मार्च या काळात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा देण्यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण 42 केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांवर मिळून एकूण 25,390 परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत.

बेळगाव शहरात महिला पदवीपूर्व स्वतंत्र महाविद्यालयासह अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तेथे विद्यार्थ्यांची तपासणी करून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यासाठी महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांसमवेत पोलिसांनीही तपासणी करून शिस्तबद्धरितीने प्रवेश देण्यात आला.

बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी परीक्षा केंद्रांवर फेरफटका मारून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाना देण्यात आल्या. विध्यार्थ्यांना किमान अर्धा तास आधी तरी केंद्रांवर उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय भरारी पथकांची रचना करण्यात आली असून ही फिरती पथके केंद्रांना अचानक भेटी देऊन कॉपी टाळण्यासाठी कार्यवाही करणार आहेत. केंद्रांभोवती काही अंतर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, कर्नाटक परिवहन मंडळाने बारावीची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना परीक्षा काळात मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी संबंधित विध्यार्थ्यांना बारावी परीक्षेचे ओळखपत्र कंडक्टरला दाखवावे लागणार आहे.

Tags: