Belagavi

रंगपंचमीला गालबोट; मजगावच्या युवकाचा मच्छे येथे निर्घृण खून

Share

दुचाकी पार्किंगवरून दोन गटात झालेल्या हाणामारीचे पर्यवसान एका तरुणाच्या खुनात झाले. ही दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात मंगळवारी दुपारी घडली. प्रतीक एकनाथ लोहार वय 21 असे मृत तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून त्याचा काटा काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादात बेळगाव तालुक्यातील मजगाव येथील प्रतीक लोहारा (21) याचा बळी गेला. प्रतीकवर होत असलेला हल्ला थांबवण्यासाठी गेलेल्या शुभम सुळगेकर नावाच्या 22 वर्षीय तरुणावरही हल्ला करण्यात आला असून तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, प्रतीक आणि त्याच्यावर हल्ला केलेले मजगाव गावातीलच आहेत. गावात गेल्या एक वर्षापासून दोन गटात वाद सुरू होता. दरम्यान, प्रतीक मच्छे येथे आला असता दुचाकी पार्किंगच्या मुद्द्यावरून प्रतीक आणि विरोधी गटात मारामारी सुरू झाली. यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना पांगवले. या गोंधळानंतर प्रतीक लोहार मच्छे येथे शुभम सुळगेकर याला भेटण्यासाठी आला असता मच्छे येथे दुचाकीवरून आलेल्या 12 जणांच्या टोळक्याने प्रतीक व शुभम यांच्यावर खुनी हल्ला केला.

प्रतीकला लक्ष्य करून हल्लेखोरांनी त्याच्या पोटात आणि छातीवर चाकूने वार केले. गंभीर जखमांमुळे अतिरक्तस्राव होऊन प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मच्छे व माजगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. डीसीपी शेखर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रतीकच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या संदर्भात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: