Belagavi

जल्लोषपूर्ण वातावरणात बेळगावात रंगपंचमी

Share

डीजेच्या तालावर रेन डान्स करत बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई, अबालवृद्धांचा शिगेला पोहोचलेला उत्साह अशा जल्लोषपूर्ण वातावरणात संपूर्ण बेळगाव शहरात रंगांचा सण रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. उत्साहाच्या भरात कसलाही अनुचित प्रकार न घडता, शांततेत रंगोत्सव साजरा करण्यात आला.

दोन वर्षानंतर कोरोनाचे सावंत पूर्णपणे हटल्याने, यंदा बेळगावकरांच्या उत्साहाला रंगपंचमीनिमित्त अक्षरशः उधाण आले होते. बेळगावच्या गल्लोगल्लीत रंगोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहात होता. सकाळपासूनच बालचमूंचा उत्साही वावर सर्वत्र दिसून आला. युवावर्गाने आपापल्या गल्लीत डीजेसह रेन डान्स, ग्रुप डान्सची आधल्या दिवशीच जय्यत तयारी करून ठेवली होती. पाण्याचे शॉवर, टँकर सज्ज ठेवण्यात आले होते. त्यांच्या मदतीनं बेभान होऊन रेन डान्स करत रंग खेळताना सगळ्यांचाच उत्साह शिगेला पोहोचला होता. लहानथोर सगळेच एकमेकाला रंग लावून आनंद लुटताना दिसून आले.

बेळगावातील पांगुळ गल्लीत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. गल्लीतील अश्वत्थामा मंदिराला आकर्षक रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली होती. मंदिरासमोर ओलेत्याने लोटांगण घालून नवस फेडण्याची प्रथा पाळताना भाविकांची श्रद्धा-भक्ती ओसंडून वाहात होती. लोटांगण घालणाऱ्या भाविकांच्या अंगावर बादल्यानी आणि पाईपने पाणी मारण्यात येत होते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

रंगपंचमीनिमित्त टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर गेल्या 14 वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदा 15व्या वर्षीही बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी होलीमिलन उत्सवाचे आयोजन केले होते. सकाळी 10 वाजल्यापासूनच या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती. रंग खेळण्यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असल्याने महिलांनी मनसोक्त रंगपंचमीचा आनंद लुटला. सिलेंडर स्प्रिंकलर कलर स्प्रे हे यंदाच्या होलीमिलन उत्सवाचे खास आकर्षण ठरले. त्याशिवाय खास युवावर्गाच्या आग्रहास्तव निमंत्रित केलेल्या डीजे रेशमाच्या तालावर ठेका धरून डान्स करत रंग खेळण्याचा आनंद सर्वानी लुटला. विविध रंगांनी माखून जात एकमेकाला रंग लावून होळी खेळताना नागरिकांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. संपूर्ण व्हॅक्सिन डेपो मैदान यानिमित्ताने रंगून गेले होते.

या संदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना होलीमिलनचे आयोजक आ. अभय पाटील म्हणाले, आमच्या सर्व उपक्रमांना बेळगावकर नागरिक भरभरून प्रतिसाद, सहकार्य देतात. आजही नागरिकांनी असाच प्रतिसाद दिला आहे. आमच्या हिंदू धर्माच्या प्राचीन परंपरा, संस्कृती जपण्याच्या हेतूने आम्ही अशा उपक्रमांचे आयोजन करतो. त्याला यापुढेही बेळगावकरांनी असाच प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आ. अभय पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत डीजेच्या तालावर होलीमिलनचा सोहळा उत्साहात रंगला. खास करून युवक-युवतींनी जल्लोषात डान्स करत रंग खेळण्याचा आनंद यावेळी लुटला.

दरम्यान, भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील यांनी माळमारुती वसाहतीमधील श्रीनगर साईमंदिराजवळ आयोजित केलेल्या रंगोत्सव-2023ला भरभरून प्रतिसाद मिळाला. याठिकाणी माळमारुती, महांतेश नगर, शिवबसव नगर, ऑटोनगर व परिसरातील नागरिकांनी जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. संगीताच्या तालावर ठेका धरत नागरिकांनी उत्साहात एकमेकाला रंग लावत रंगांची उधळण केली. स्वतः आयोजक मुरगेंद्रगौडा पाटील यांनी नागरिकांसमवेत ठेका धरत डान्स करण्याचा आनंद लुटला.

याशिवाय खडक गल्ली, चव्हाट गल्ली, गोंधळी गल्ली, गणाचारी गल्ली, कंग्राळ गल्ली, काळी आमराई, महाद्वार रोड आदींसह बेळगाव शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. डीजेच्या ठेक्यावर दणदणाट करत रंगांची उधळण करताना सर्व वयोगटाच्या नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. सुदैवाने कसलाही अनुचित प्रकार न घडत शांततेत होळी व रंगपंचमी सण बेळगावात साजरा करण्यात आला. दरम्यान रंगपंचमीनिमित्त बेळगाव शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फिरत्या वाहनातूनही सर्वत्र पोलीस गस्त घालताना दिसून आले. वडगाव, शहापूर, खासबागसह तसेच अनेक खेड्यांत येत्या रविवारी, 12 मार्च रोजी पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे.

Tags: