चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूर गावात प्रथमच श्री वीरभद्रेश्वराचा रौप्य रथोत्सव सुवासिनींकडून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

या रौप्य रथोत्सवाला श्रीशैल जगद्गुरू चन्नासिद्धराम पंडितराध्या महास्वामीजी यांनी चालना दिली. हा रौप्य रथोत्सव श्रीवीरभद्र मंदिरापासून श्रीकाडसिद्धेश्वर मठ, चन्नम्मा चौक, रुद्रपद बसवेश्वर मंदिरापर्यंत सर्व वाद्यांसह कूच केले. हिरव्या साड्या नेसून सुवासिनी महिला यात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. रथोत्सवाच्या मार्गावर दुतर्फा सुबक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

मार्गावर भाविकांनी रथावर शरदह-भक्तीने फुलांची उधळण केली. यावेळी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रथाच्या समोर पुरवंतांनी विस्मयकारक प्रात्यक्षिके सादर करून सर्वाना अचंबित केले. शस्त्रे पाजरत पुरवंतांनी रथ मिरवणुकीत भाग घेतला. होळी पौर्णिमेनिमित्त काढलेल्या या रथोत्सवात भक्तांनी मंदिरासमोर इंगळ्या न्हाल्या. दरवर्षी होळी पौर्णिमेला हा रथोत्सव आयोजित केला जातो. मात्र यंदा प्रथमच महिलांनी रथ ओढून नवा इतिहास घडविला. त्यानंतर चांदीचा रथ श्रीवीरभद्रेश्वर मंदिरात परत आला.
यावेळी अंबिकानगरचे स्वामीजी, बनहट्टी स्वामीजी यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.


Recent Comments