Belagavi

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी फेडले जनतेचे ऋण : डीकेशी, राजहंसगडावर शिवरायांना केले नमन

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंस गडावर उभारण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भेट देऊन नमन केले. यावेळी त्यांनी हा भव्य पुतळा उभारून आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जनतेचे विशेषतः मराठी जनतेचे ऋण फेडले अशी प्रशंसा केली.

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. तेथे भेट देऊन शिवरायांना नमन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करून संपूर्ण जगासमोर आदर्श ठेवला आहे.

त्यांची मूर्ती उभारणे, त्यांचा आदर्श बाळगणे आपले कर्तव्य आहे. मी अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पाहिले. परंतु राजहंस गडावरील हा पुतळा देशात सर्वात उंच आणि अतिभव्य आहे. या कामासाठी मी कन्नड व संस्कृती खात्याचा मंत्री असताना निधी मंजूर केला होता. त्यातून हे भव्य प्रेरणादायी शिल्प उभे राहिल्याचे मला समाधान वाटते.

 

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मतदार संघात कल्याणकारी कामे केली आहेत. त्यांना जनतेने, मराठी भाषिकांनी नेहमीच पाठिंबा दिलाय. या पुतळा उभारणीतून त्यांनी जनतेचे विशेषतः मराठी भाषिकांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारं येतात आणि जातात, मात्र लोकप्रतिनिधींनी केलेलं काम स्मरणात राहते. हेब्बाळकर यांनी असेच अविस्मरणीय काम केले आहे अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी व्यक्त केली.

रविवारी पुतळा प्रतिष्ठापनेनंतर सायंकाळी शिवकुमार यांनी राजहंस गडाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमोर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्याशिवाय क्रॅकर शो, लाईट लेसर शो आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याचा डी. के. शिवकुमार यांनी आनंद लुटला. यावेळी आ/ लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर तसेच ग्रामीण जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: