Belagavi

नवी करवाढ नको : बेळगाव मनपाच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मागणी

Share

बेळगाव शहरात कोणत्याही प्रकारे मालमत्ता करात, पाणीपट्टीत वाढ करू नये. तसेच बेळगाव मनपाला सहकार्य न करणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी आ. अभय पाटील यांनी केली. थकीत कर वसूल करण्याची मागणी त्यांनी तसेच आ. अनिल बेनके आणि नगरसेवकांनी केली.
बेळगाव महापालिकेची अर्थसंकल्पपूर्व बैठक मनपा सभागृहात पार पडली. यावेळी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे 4 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. ती ते लवकर भरत नाहीत. बेळगाव मनपाकडून बोर्डाला सर्व सहकार्य करूनही बोर्डाकडून मनपाला सहकार्य केले जात नाही. बोर्डाचे सीईओ उद्धटपणे वागतात. थकीत पाणीपट्टीमुळे मनपाला त्रास होत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी त्यांनी महापौर शोभा सोमनाचे यांच्याकडे केली. बाईट
यावेळी आ. अनिल बेनके यांनीही आ. अभय पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला. दोन्ही आमदारांनी बेळगावच्या नागरिकांवर कसल्याही प्रकारे नवी करवाढ लादू नये, अशी मागणी केली. त्याला नगरसेवकांनीही समर्थन दिले. कोरोना व अन्य कारणांमुळे बेळगावकर आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे करवाढीचा नवा बोजा त्यांच्यावर लादणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका दोन्ही आमदारांनी यावेळी मांडली. बेळगावात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. ती सोडवली पाहिजे. प्रत्येक वार्डात बोअर मारण्याची मागणी त्यांनी केली. सर्व नगरसेवकांनी शहराच्या विकासावर भर द्यावा. बेळगाव स्मार्ट सिटी आधीच आहे. लोकांनी हुशार व्हायला हवे. जनतेची अडचण ओळखून बेळगाव महानगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.


यावेळी बोलताना महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी अमृत शहर, नगरविकास विभागासह विविध विभागांकडून मनपाला अनुदान येत असल्याचे सांगितले.
अशोक नगरमध्ये ड्रेनेज आणि रस्त्याची समस्या तीव्र असल्याचे अपक्ष सदस्य रियाज किल्लेदार यांनी सांगितले. याबाबत अनेकवेळा आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊनही उपयोग झाला नाही. महापालिकेच्या येत्या अर्थसंकल्पात या कामांसाठी अनुदान राखीव ठेवावे, अशी विनंती त्यांनी केली.

काँग्रेसचे सदस्य अजीम पटवेगार म्हणाले की, दावा केला जातो तेवढे बेळगाव शहर स्मार्ट नाही. अनुदान केवळ गटार आणि रस्त्यांवर खर्च करण्यात आले आहे. तेही सुसज्ज नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हस्तक्षेप करत आ. अनिल बेनके यांनी प्रभाग निहाय विकास मॉडेलमध्ये आराखडा तयार करून विकास केला आहे. त्यात ड्रेनेजची समस्या जैसे थेच राहिल्याचे त्यांनी सांगितले.

अपक्ष सदस्य शंकर पाटील यांनी, शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी सूचना केली. त्यावर पालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी म्हणाले की, बेळगाव शहरात 17 हजार भटकी कुत्री आहेत. 2,100 कुत्री यापूर्वीच पकडण्यात आली आहेत. भटक्या कुत्र्यांना आटोक्यात आणण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे सदस्य बसवंत मुतगेकर म्हणाले की, बसवनकुडचीत पिण्याच्या पाण्याची, ड्रेनेजची आणि रस्त्यांची समस्या गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विशेष अनुदान राखून ठेवावे, अशी सूचना त्यांनी केली.
काँग्रेसचे सदस्य अजीम पटवेगार यांनी यावेळी महापालिकेचे उत्पन्न कमी असले तरी अधिकाऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांवर बोजा पडत असल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना पालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी सांगितले की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असतील आणि त्याबाबतचे पुरावे, कागदपत्रे दिली तर कारवाई केली जाईल.


आमदार अनिल बेनके म्हणाले की, कॅन्टोन्मेंट बोर्ड शहराच्या विकासासाठी मेहनत घेत नाही. बोर्डाचे सीईओ फोन स्वीकारत नाहीत. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यास परवानगी न देणाऱ्या बोर्डाला पिण्याचे पाणी न देण्याची मागणी त्यांनी केली.
महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, सत्तारूढ पक्षनेते राजशेखर डोणी, समिउल्ला माडीवाले, रवि धोत्रे यांच्यासह नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.

Tags: