Belagavi

सुख-शांती हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार : राजयोगीनी ब्रह्माकुमारी जयंतीदीदी

Share

भौतिक सुखाच्या मागे लागून आपण आपल्या जीवनातील सुख शांती गमावून बसलो आहोत. अशावेळी प्रत्येकाने स्वधर्माची ओळख करून घेणे आवश्यक आहे. जीवन कल्याणासाठी सुख-शांती महत्त्वाची आहे. सुख शांती हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माउंट आबू येथील अतिरिक्त प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी जयंतीदीदी यांनी केले.

उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे शुक्रवारी सायंकाळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बेळगाव शाखांच्या वतीने शांती सद्भावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजयोगिनी जयंतीदीदी यांच्यासह प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे कार्यकारी सचिव मृत्युंजय भाई, विभागीय आयुक्त एम. जी. हिरेमठ, वाहतूक पोलीस विभागाच्या डीसीपी स्नेहा, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव विभाग प्रमुख अंबिका दीदी, दुबई येथून आलेल्या ज्योतिका बेन यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना जयंतीदीदी म्हणाल्या, ईश्वराने स्वर्णिम भारताची निर्मिती केली. पाचशे वर्षांपूर्वी या देशात आलेले परदेशी भारताचे गुणगान करीत असत. मात्र पूर्वीच्या आणि आजच्या काळात मोठा बदल झाला आहे. सर्वत्र दुःख आणि अशांतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वांनाच चिंतेने ग्रासले आहे. अशावेळी माणसाने स्वधर्माची ओळख करून घेणे आवश्यक आहे.

हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी म्हणाले, अध्यात्मिक शक्तीद्वारे सुखशांतीची अनुभूती प्राप्त होते. प्रत्येकाने परमेश्वराचे ज्ञान आणि सत्याच्या मार्गाने जीवनाची वाटचाल केल्यास, पुन्हा एकदा सतयुग अवतरेल. सुख शांतीने जीवन जगताना प्रत्येकाविषयी आदर आणि सद्भावना आवश्यक आहे. भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळे आशा वाढत जातात. आशेला अंत नसतो. भौतिक सुखांच्या आशेतून अशांती निर्माण होते. अशावेळी आंतरिक सुखातून सुख शांती प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले जीवन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःमध्ये परिवर्तन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्री. हिरेमठ यांनी केले. सूत्रसंचालन जयसिंगभाई, श्रीनिधीभाई आणि विद्याबेन यांनी केले. शिविका दीदी यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संपूर्ण कार्याची माहिती दिली. संपूर्ण जगात महिलांद्वारे चालविली जाणारी पहिली व सर्वात मोठी अध्यात्मिक संस्था अशी ख्याती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाची आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि देशभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Tags: