40 पर्सेंट कमिशनच्या भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे जनता काँग्रेसच्या बाजूने उभी आहे. आगामी निवडणुकीत राज्यात काँग्रेसचं सत्तेत येईल आणि बेळगाव ग्रामीण मतदार संघात लक्ष्मी हेब्बाळकर या किमान एक लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होईल असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी व्यक्त केला.
बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथे काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेनिमित्त भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी भाजप आणि माजी आमदार संजय पाटील यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात जनतेचा कल काँग्रेसकडे वाढला आहे. भ्रष्ट भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. याची खात्री पटल्यानेच भाजप नेते काँग्रेसवर बेताल टीका करत असल्याचा आरोप सिद्दरामय्यांनी केला.

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या पुढे म्हणाले, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजहंसगड किल्ल्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. पण आता पराभूत आमदार आणि सीएम बोम्मई उद्घाटनाला येत आहेत. संजय पाटील यांचा चेहरा मी कधीच पाहिला नाही. पुतळ्यासाठी मी अनुदान दिलेले नाही, असे संजय पाटील सांगतात.
पण जर त्यांनी माझ्याकडे अनुदान मागितले तर मी ते 100% दिले असते. पण हे गिऱ्हाईक माझ्याकडे आलेच नाही, ते खोटे बोलत आहे. 2023 च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल. लक्ष्मी हेब्बाळकर या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून आमदार होणार हे निश्चित आहे. गेल्या वेळी त्या 50 हजार मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या, पण यावेळी त्या 1 लाख मतांच्या फरकाने विजयी होतील असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी संजय पाटील यांच्यावर सडकून टीका केली. मात्र माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे नाव घेतले नाही.
यावेळी बोलताना बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर सडकून टीका केली. माझ्या मतदारसंघाचा विकास काही लोकांना सहन होत नाही. स्वयंघोषित नेते गोकाक आमदारांना मिळत नाहीत. निवडणुकीला दोन महिने बाकी असताना तुम्ही आमच्या मतदारसंघात आलात.

कोविड आणि पूर आला तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? असा सवाल त्यांनी केला. जारकीहोळी यांनी 23 वर्षे आमदार म्हणून काम केले. त्यांना 16 सरकार मिळाले. संकुचित वृत्ती ते दाखवून देत आहेत. गोकाकमध्ये पोलिस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, सब रजिस्टर ऑफिस कसे काम करतात. एक एकर खरेदी करण्यासाठी 10 लाख दिले पाहिजेत. गोकाक एक गणराज्य बनले आहे. स्वतःला शेकडो कोटींना विकून ते मला भ्रष्टाचाराचा धडा शिकवायला आले आहेत. गोकाकच्या माननीय आमदारांनो, भ्रष्टाचार एकवेळ बाजूला ठेवा.
मतदारसंघातील जनतेचे ऊस बिल द्या आणि मग बोला. तुमचे नाव लिहून ठेवून नंदीहळ्ळी येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. राहुल गांधी आले त्याच दिवशी आत्महत्या केली. आमच्या मतदारसंघातील जनतेची ऊसबिलाची थकबाकी भरून बोला, असे आव्हान आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.
त्या पुढे म्हणाल्या, मी स्वयंघोषित नेत्यांना प्रश्न करते. नागेश मन्नोळकर यांना घेऊन धावपळ करताहेत. निवडणुकीच्या आदल्या रात्री तुम्ही आमच्या घरी आला होता. 40 लाख दिल्यास तुमच्या काँग्रेसमध्ये येईन, असे म्हणाले होतात. मी याबाबत शपथ घ्यायला तयार आहे. मी मळेकरणी देवीची शपथ घ्यायला तयार आहे.

वीरकुमार, विवेक कुमार, महांतेश कवटगीमठ यांना रमेश यांनी घरात पाठवले होते. त्यांना समाधान म्हणून नाही. मी उभारलेल्या पुतळ्याचे उद्घाटन तुम्ही करणार आहात?, माजी आमदार संजय पाटील यांना काय अधिकार आहे? तिथली जमीन विकून पैसे कमवलेत ना?, संजय पाटील तुम्ही 10 वर्षांत 20 कोटी अनुदान आणले. तुमच्या आमदार निधीतून ते का करता आले नाही?, गोमटेश विद्यापीठासाठी 40 लाख रुपये घेऊन गेलात. तुमची शैक्षणिक संस्था दक्षिण मतदारसंघात असूनही ग्रामीणचा निधी अवैधपणे का नेले? असा खडा सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.
प्रजाध्वनी कार्यक्रमात बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले की, दोन महिन्यांत निवडणूक होणार असून काँग्रेस पुन्हा राज्याचे सुकाणू हाती घेणार हे निश्चित आहे.
काँग्रेस गॅरंटी कार्डबाबत बोलताना जारकीहोळी म्हणाले की, सत्तेवर आल्यास काँग्रेस विशेष पॅकेज देणार आहे. भाजपचा भ्रष्टाचार संपूर्ण देशाने पाहिला आहे. देशातील व राज्यातील जनता भाजपच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली असून काँग्रेसकडे नव्या आशेने पहात काँग्रेसच्या बाजूने उभी रहात आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस नेते जमीर अहमद व इतरांनी सभेला संबोधित केले. सभेच्या प्रारंभी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून सिद्दरामय्या व अन्य काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आ. हेब्बाळकर यांनी सिद्दरामय्या यांना तलवार आणि कोकरू भेट देऊन सत्कार केला. यावेळी म. ए. समिती युवा आघाडीचे माजी अध्यक्ष भाऊराव गडकरी यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बागेवाडी दर्गा अश्रफ पिरा, भागण्णा नरोटी यांच्यासह काँग्रेस नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments