अबकारी निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे, कृपया याबाबत तपशील द्या. आम्ही कोणत्याही तपासासाठी तयार आहोत. असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
सिद्धापूर येथे विविध योजनांतर्गत सुविधांचे वाटप केल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, अबकारी निविदा मंजुरीत घोटाळा झाल्याच्या आरोपाबाबत काँग्रेसने सविस्तर पुरावे, तपशील द्यावा, कोणताही तपशील, पुरावा न देता नाहक आरोप करणे निरर्थक असल्याचे ते म्हणाले.
आमदार प्रियांक खरगे यांचा ऑडिओ प्रसिद्ध झाल्याबद्दल उत्तर देताना, त्यांच्यावरही अनेक आरोप आहेत. पीएसआय प्रकरणातही त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यांनी तपशील दिल्यास आता लोकायुक्त आहे, तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या उद्यापासूनच्या नियोजित संपाबाबत बोलताना, आज सायंकाळी वेतन आयोग आणि अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले. सरकारी कर्मचारी आमचे आहेत. त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचा अंतरिम अहवाल प्राप्त करून शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे. राज्य सरकार आयोगाच्या संपर्कात असून, तत्काळ अंतरिम अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. विधानसभेतही हे स्पष्ट करण्यात आले आहे. वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर त्याच्या शिफारशी लागू केल्या जातातच, असे बोम्मई यांनी सांगितले.


Recent Comments