सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हितदृष्टीच्या उद्देशाने आजपासून रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवसन्मान पदयात्रे’ ला सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आज येळ्ळूर येथील राजहंसगडावरून करण्यात आला.
रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. पदयात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. जोरदार घोषणाबाजी करत गड परिसर दणाणून सोडण्यात आला. येळ्ळूर भागातून सुरु करण्यात आलेल्या पदयात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवरायांचा राजकारणापुरता करण्यात येणारा वापर, निवडणुका जवळ आल्यानंतर मराठी माणसांचा सोयीनुसार करण्यात येणारा वापर, रेल्वेस्थानकावर जाणीवपूर्वक डावलण्यात आलेली शिवरायांची प्रतिमा, रेल्वेस्थानकाला शिवाजी महाराजांचे नाव देऊन नामकरण करणे, राजकीय स्वार्थासाठी मराठी मतदारांचा करण्यात येणारा वापर, भगव्याची सातत्याने होणारी विटंबना, शिवरायांची होणार अवमान असे विविध उद्देशदृष्टिकोनात ठेवून याविरोधात आवाज उठवून जनजागृती करण्यासाठी हि पदयात्रा आयोजिण्यात
आली आहे.

पदयात्रेच्या पहिल्याच दिवशी दिसून आलेला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पुढील ५ दिवस हि यात्रा उत्स्फूर्तपणे सुरु राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे. सीमाभागात सातत्याने मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी हि पदयात्रा असून अधिकाधिक सीमावासीयांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धामणे, अवचारहट्टी आदी भागात महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवभक्तांनी सकाळच्या सत्रात शिव सन्मान पद यात्रेचे स्वागत करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त करत सहभाग दर्शवण्यात आला.


Recent Comments