Belagavi

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने हजारो शिवभक्तानी घेतले दर्शन

Share

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमधील श्री कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि धार्मिकतेने साजरी करण्यात आली . हजारो शिवभक्तानी , मंदिरात ओम नमः शिवाय चा जप करीत, कपिलेश्वरांचे दर्शन घेतले .

बेळगावमधील कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने संपूर्ण मंदिर आणि परिसर शिवमय झाला होता . महाशिवरात्रीचा उपवास करून, श्री शिवशंभोच्या दर्शनासाठी भाविकांनी अगदी सकाळपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या . महिला , पुरुषांबरोबरच अगदी लहान मुले देखील दर्शनासाठी आली होती .

कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाला बेल , आणि फुलांची आरास करण्यात आली होती . भाविकांची लांबच लांब दर्शनासाठी लागलेली होती . दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाशिवरात्रीचे महत्व आणि उपवासाचे महत्व सांगितले . दर्शन घेऊन तृप्त झालो , खूप समाधान वाटले असे सांगितले .

राजस्थानमधील जयपूर येथून रामेश्वर यात्रेला जाणारे साधू शेरनाथ यांनी दक्षिण काशी कपिलेश्वर
दर्शनासाठी आलो असल्याचे सांगितले . महाशिवरात्रीचा दिवस शुभ असतो . आणि भगवान भोलेनाथांनी सर्वांवर कृपादृष्टी ठेवून सर्वांचे कल्याण करा अशी सदिच्छा व्यक्त केली .

यावेळी मंदिर ट्रस्ट कमिटीचे सदस्य राकेश कलघटगी यांनी मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने सर्व शिवभक्तांना , महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या . आज मंदिरात आनंदमय वातावरण आहे . . कपिलेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष डौलात साळुंखे यांनी मंदिरात पहिला अभिषेक केला . त्यानंतर नोंदणी केलेल्या भाविकांचे अभिषेक करण्यात आले . मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनाची तसेच प्रसादाची उत्तम सोय करण्यात आली आहे . रात्रीपर्यंत किमान एक लाख लोक मंदिरात दर्शन घेतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला .

तर मंदिराचे पुजारी सुरज यांनी जगाच्या कल्याणासाठी शिवशंभोकडे प्रार्थना केली . सर्वाना आनंद , सुख , समाधान लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली .
कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि धार्मिकतेने साजरी करण्यात येत आहे . रात्रीपासूनच भक्तगण मंदिरात दर्शनासाठी येत आहेत .

Tags: